लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जिने जन्म दिला, टक्केटोणपे सहन करत लहानाचे मोठे केले, शिकवले, चांगले संस्कार घडवले त्याच मातेला रागाच्या भरात तीक्ष्ण हत्याराने ठार मारून तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून अडीच महिने घरातच लपवून ठेवल्याची मन विषण्ण करणारी घटना बुधवारी लालबागसारख्या परिसरात उजेडात आली. ज्या अभागीची हत्या झाली तिचे नाव वीणा जैन असे असून घृणास्पद काम करणाऱ्या मुलीचे नाव रिम्पल (२४) आहे. तिला काळाचौकी पोलिसांनी अटक केली. बारावीपर्यंतच शिकलेल्या रिम्पलने इलेक्ट्रिक मार्बल कटर, कोयता आणि चाकू यांचा वापर करत आईच्या मृतदेहाचे तुकडे केले.
लालबागमधील इब्राहिम कासम चाळीच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक २२ मध्ये ५५ वर्षीय वीणा जैन मुलगी रिम्पलसह राहात होत्या. रिम्पल तीन वर्षांची असतानाच वीणा यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा भाऊ सुरेशकुमार पोरवाल यांनी मायलेकीला काळाचौकी येथील मालकीच्या घरात आधार दिला. ते येथील गुंडेचा गार्डनमध्ये राहतात.
असा आला संशय
- दोन महिन्यांपासून वीणा चाळीत कुठेच दिसत नव्हत्या. चाळीतील लोकांनी तसे पोरवाल यांना कळवले. मंगळवारी सायंकाळी पोरवाल यांची मुलगी पैसे देण्यासाठी कासम चाळीत आली.
- मात्र, रिम्पलने आई झोपली असल्याचे सांगत तिला घरात घेतले नाही. त्यानंतर मामीने घराचा कानोसा घेतला. परंतु तिलाही रिम्पलने बाहेरच थांबवत दार उघडले नाही.
- संशय आल्याने पोरवाल यांच्या मुलाने दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला. तेव्हा वीणा तिथे दिसल्या नाहीत. आई कानपूरला गेल्याचे रिम्पलने सांगितले.
- अखेरीस पोरवाल कुटुंबीयांनी रात्री पोलिस ठाण्यात वीणा जैन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
कपाटात, टाकीत लपवले मृतदेहाचे तुकडे
पोलिस जैन यांच्या घरात गेले तेव्हा, घरभर दुर्गंधी होती. झडती घेतली असता विदीर्ण करणारे दृश्य समोर आले. वीणा जैन यांचे डोके व धड दोन साड्यांमध्ये गुंडाळून ते प्लास्टीकच्या पिशवीत टाकत कपाटाच्या खालच्या कप्प्यात लपविण्यात आले होते. बाथरूममधील स्टीलच्या टाकीत वीणा यांचे शरीराचे इतर भाग कापून ठेवण्यात आले होते. किडे लागलेल्या अवस्थेत हे सर्व अवयव केईएममध्ये पाठविण्यात आले. पोलिसांनी घरातून इलेक्ट्रिक मार्बल कटर, चाकू, कोयता जप्त केले.
म्हणे, आई पडली
रिम्पलने पोलिसांना दिलेल्या कबुलीत, २७ डिसेंबर रोजी आई पहिल्या मजल्यावरून खाली पडली. त्यामध्येच तिचा मृत्यू झाला. मात्र, नातेवाईक मलाच दोषी समजतील म्हणून तिचे तुकडे करून लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले.
भांडणातून हत्या?
वादातून तिने हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, यामागे आणखीन काही कारणे आणि इतर कुणाचा सहभाग आहे का? या दिशेने पोलिस तपास करत आहेत. पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"