लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: पशुखाद्याच्या बनावट बिल्टीवर मध्यप्रदेशातून नागपूर येथे नेल्या जाणारी ८०० खोके दारू गुरूवारी जप्त करण्यात आली. मुंबई येथील भरारी पथकाने गुरूवारी पहाटे ही कारवाई केली. त्यांना बुलडाणा आणि खामगाव येथील पथकाने सहकार्य केले.
मध्यप्रदेशातील एका दारू कारखान्यातून सीजी ०७ एव्ही ४४७६ या ट्रकमधून नागपूर येथे दारूची वाहतूक केली जात होती. दारूची वाहतूक करणाºया ट्रकसाठी पशुखाद्याची बनावट बिल्टी तयार करण्यात आली. तसेच पशू खाद्याच्या आत लपवून देशीदारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती महाराष्ट्र भरारी पथक मुंबई यांना मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर त्यांनी अभिनव बानोले अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वाशिम यांना माहिती दिली. अभिनव बानोले यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करून भरारी पथक व राज्य उत्पादन शुल्क बुलडाणा यांनी संयुक्त कारवाई केली. गुरूवारी अडीच वाजता दरम्यान टेंभूर्णा फाटा येथे ट्रक पकडण्यात आला. या ट्रकची तपासणी केली असता पशू खाद्याच्या आतमध्ये मध्यप्रदेशातील दारूचे ८०० खोके मिळून आले. या दारूची किंमत पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे.