मुंबई : चिमुकलीच्या जन्मामुळे कफ परेड येथे राहाणारे चितकोटे कुटुंबीय आनंदात होते. मात्र त्यांच्या या आनंदावर तीन महिन्यातच विरजण पडले. आईवडील मुलीच्या भविष्याची स्वप्ने रंगवत असताना, बाळाला आशीर्वाद दिल्यानंतर पैसे आणि साडी दिली नाही, या रागाने त्याच परिसरात राहणाऱ्या तृतीयपंथीयाने तीन महिन्यांच्या बाळाचे अपहरण करत त्याला खाडीत जिवंत पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी तृतीयपंथीय कन्हैया चौगुले उर्फ कन्नू (३०) आणि त्याचा साथीदार सोनू कांबळे (२२) यांना अटक केली आहे.
चितकोटे कुटुंबीयांच्या घरात तीन महिन्यांपूर्वी आर्याचा जन्म झाला. आधी एक मुलगा असल्याने दुसरी मुलगी झाली म्हणून कुटुंबीय आनंदात होते. ३ महिन्यांची आर्या आईवडिलांसोबत राहत होती. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास जवळच राहणारा तृतीयपंथी कन्नू त्यांच्या घरी धडकला. आशीर्वाद देत त्याने मुलीच्या जन्मानिमित्त एक साडी, नारळ आणि अकराशे रुपयांची मागणी केली. मात्र घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ती मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याने चितकोटे कुटुंबीयांनी त्याला नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर कन्नू तेथून निघून गेला.
या कारणावरून रागावलेला कन्नू आपल्या घरी बसला असताना त्याचा मित्र सोनू तेथे गेला. कन्नूने घडलेला प्रकार सांगून आपला अपमान झाल्याचे सोनूला सांगितले. चर्चेअंती दोघांनी चितकोटे कुटुंबीयांना धडा शिकविण्याचे ठरवले. बदला घेण्यासाठी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कुटुंबीय दरवाजा उघडा ठेवून झोपले असताना कन्नूने लहानग्या आर्याचे अपहरण केले आणि सोनू कांबळेच्या मदतीने आंबेडकर नगर भागात खाडी परिसरातील दलदलीत बाळाला जिवंत पुरले. काही वेळाने मुलगी घरातून गायब झाल्याचे समजताच चितकाेटे कुटुंबीयांनी कफ परेड पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत शोध सुरु केला.
चौकशीच्या वेळी चितकोटे कुटुंबीयांकड़ून कन्नूसोबत घडलेला प्रसंग समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने त्वरित गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे.
मृतदेह ताब्यात खाडीतून मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. या घटनेमुळे चितकोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कफ परेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.