मुंबई - साताऱ्यातील कोरेगावातील विनायक बर्गे या श्रीमंत घरातील मुलाने मुंबई पोलिसांच्या नाकी दम आणला. शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास क्रॉफर्ड मार्केटजवळील पोलीस मुख्यालयाबाहेर विनायकने पोलीस आयुक्तांना भेटण्याचा तगादा लावला होता. ओबेरॉय आणि अंबानी यांना मारण्याच्या कटाची माहिती देण्यासाठी या तरुणाने आयुक्तांना भेटण्यासाठी हुज्जत घातली होती. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्या तरुणाचे कारण ऐकून पोलीस चक्रावून गेले. मुंबई पोलीस किती अलर्ट आहेत हे पाहण्यासाठी त्याने हा खेळ रचवला होता. मात्र त्याला हा खेळ महागात पडला असून एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारीच्या मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ओबेरॉय आणि अंबानी यांना मारण्याच्या कटाची माहिती देण्यासाठी हुज्जत ठोकलेल्या विनायकला पोलिसांनी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात नेले. तेथे पोलीस उपायुक्त दर्जाच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली. मात्र तरीही एल. टी. मार्ग पोलिस ठाण्यातही अायुक्तांचा भेटण्यासाठी त्याने हुज्जत घातली होती. सुरूवातीला पोलिसांना तो मद्यपान करून आला असल्याचा संशय आला. मात्र, पेहराव अाणि बोलण्यावरून चांगल्या घरातील वाटत असल्याने तेथील पोलीस अधिकाऱ्याने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नव्हता. शेवट त्याने दिलेल्या माहितीवरून मुंबई पोलिसांनी जुहू परिसर तसेच अन्य संवेदनशील परिसरात तपास सुरु केला. पोलिसांनी कंबर कसली. मात्र पोलिसांचा फज्जा उठवत विनायकने मी फक्त मुंबई पोलीस किती अलर्ट आहे हे पाहण्यासाठी हे नाटक केले असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०५(२), १७७, १०२ अन्वये जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. विनायक हा शनिवारी मुंबईत चित्रपटात गुंतवणूक करण्यासाठी एका व्यक्तीस भेटायला आला होता. मात्र, त्या व्यक्तीने त्याला सोमवारी भेटण्यास सांगितल्याने विनायकने मुंबई दर्शन करायचे ठरविले. त्यादरम्यान त्याने जुहू चौपाटी फिरला आणि हा पोलिसांशी खेळ खेळण्याचा कट शिजवला.