मुंबई : दिंडोशी पोलिसांनी पालिकेच्या कंत्राटी डॉक्टरला बुधवारी अटक केली आहे. त्याने त्याच्या सहकारी महिला डॉक्टरचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याचा त्याच्यावर आरोप असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिंडोशी पोलिसांनी अटक केलेल्या डॉक्टरचे नाव सुशांत कदम असे असून त्याच्यावर आरोप करणाऱ्या महिला डॉक्टर यांना ते ओळखतात. ते दोघेही पालिकेचे कंत्राटी डॉक्टर असून त्यांनी सोबत काम केले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम आणि पीडित डॉक्टरमध्ये काही आर्थिक व्यवहार झाले होते. त्यावरून पुढे त्यांच्यात वाद झाले. तेव्हा डॉक्टरने पीडितेबाबत परिचितांकडे अश्लील भाषेत बोलण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर त्याने तिचे आक्षेपार्ह फोटोही व्हायरल केले.
ही बाब पीडितेला समजल्यानंतर तिने दिंडोशी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांनी महिला डॉक्टराचा लैंगिक छळ आणि धमकी दिल्याप्रकरणी कदम याच्यावर कलम ३५४ (ए) (३), ५००, ५०४,५०६,५०९ (३) आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यात आली असून एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याने पाठवलेले फोटो मोर्फ आहेत का, याचाही तपास पोलिस करीत आहेत.