नवी मुंबई : पालिकेकडून कारवाई सुरु असताना फेरीवाल्यांनी पालिकेच्या पथकावर हल्ला केल्याची घटना नेरूळमध्ये घडली. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात पालिकेची कारवाई सुरु होती. तिथल्या काही फेरीवाल्यांकडे प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या होत्या. शिवाय काहींकडे मास्क देखील नव्हता. तर खरेदीसाठी जमणाऱ्या ग्राहकांकडून सामाजिक अंतर राखले जात नव्हते. यामुळे पालिकेच्या पथकाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाईला सुरवात केली. यावेळी विभाग अधिकारी दत्तात्रय नांगरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
परंतु पालिकेकडून होत असलेल्या कारवाईचा राग आल्याने काही फेरीवाल्यांची कांदे, नारळ तसेच वजन फेकून मारून पालिका अधिकारी व कर्मचारी यांना पिटाळून लावले. यामध्ये काही कर्मचाऱ्यांना किरकोळ मार लागला आहे. दरम्यान काहींनी चाकू घेऊन देखील पथकाचा पाठलाग केल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अखेर पालिकेच्या पथकाला थेट नेरुळ पोलिसठाण्यात धाव घ्यावी लागली. घडलेल्या घटनेप्रकरणी पालिका अधिकारी विजय पाटील यांनी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून शहरातील अनधिकृत फेरीवाले प्रशासनाची डोकेदुखी ठरू लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे तरी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पालिकेने ठोस पाऊल उचलावे अशी मागणी होत आहे.