लाेकमत न्यूज नेटवर्कवाडी- नागपूर : १२ वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्रुगधामना येथे सोमवारी दुपारी घडली. अनैतिक संबंधाचा बोभाटा होऊ नये म्हणून ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा संशय असून या प्रकरणात संशयीत असलेल्या एका युवकाची तसेच त्याच्या मैत्रीणीची चाैकशी रात्री उशिरापर्यंत वाडी ठाण्यात चाैकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
सुजल नाशिक रामटेके (१२, रा. द्रुगधामना, ता. नागपूर ग्रामीण) असे मृत मुलाचे नाव आहे. सुजलची आई खासगी काम करते तर वडील माथाडी कामगार आहेत. हे दोघे कामावर गेले होते. सुजल आणि त्याची १७ वर्षीय बहीण घरी हाेते. ताे दुपारी दुकानात जातो असे सांगून घराबाहेर गेला. दीड तासानंतर तो ‘वाचवा, वाचवा’ ओरडत घरी आला. बहिणीने त्याला काय झाले, अशी विचारणा करून पाणी प्यायला दिले. त्यानंतर तो निपचित पडला, असे सुजलच्या बहिणीने आजुबाजुच्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी बघितले तेव्हा सुजलचा मृत्यू झाला होता. त्याच्या गळ्यावर आवळल्याचे दिसत होते. परिणामी सुजलच्या आईवडीलांसोबतच पोलिसांनाही कळविण्यात आले. वाडीच्या ठाणेदार ललिता तोडासे सहकाऱ्यांसह तेथे पोहचल्या.
घटनास्थळावरचे चित्र संशयास्पद वाटत असल्याने त्यांनी वरिष्ठांना कळविले. त्यानंतर उपसरपंच बंडू गजभिये यांच्या मदतीने पाेलिसांना सूचना दिली. उपायुक्त नुरूल हसन, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी घटनास्थळ गाठले. सुजलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. डॉक्टरांनी गळा आवळून सुजलची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी सुजलच्या नेहमी घरी येणाऱ्या एका युवकाला तसेच युवतीला ताब्यात घेतले. सुजलची आरोपींसोबत झटापट
नाशिक रामटेके यांना दाेन अपत्ये असून, सुजल त्यातील लहान मुलगा हाेता. त्याच्या मानेवर जखमा व डाेळ्यातून रक्त येत असल्याची माहिती कुटुंबीयांसह उपसरपंच बंडू गजभिये व इतरांनी दिली. त्याचे आईवडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. ताे जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहाव्या वर्गात शिकायचा. तो हुशार आणि चुणचुणीत होता. त्याने स्वताचा जीव वाचविण्यासाठी आरोपींसोबत झटापटही केल्याच्या त्याच्या शरिरावर खुणा आहेत.
दिशाभूल करण्याचा प्रयत्नसुजल ओरडत घरी आला. त्याचा बाहेर गळा आवळण्यात आल्याची माहिती देऊन संशयीतांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र, घटनास्थळी आढळलेल्या आक्षेपार्ह पुराव्यामुळे अनैतिक संबंधांचा बोभाटा होऊ नये म्हणून निरागस सुजलची हत्या करण्यात आल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी १७ वर्षीय मुलगी आणि तिचा प्रियकर या दोघांना चाैकशीनंतर रात्री उशिरा अटक केली.