राजगुरूनगर: किरकोळ कारणावरुन वाद होऊन दारूच्या नशेत २५ वर्षीय युवकाचा खून झाला आहे.आरोपींनी अपघाताचा बनाव करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह खेड घाटात टाकला. मयुर सुरेश एरंडे (वय २५, रा. थुगाव ता.आंबेगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव असुन खेडपोलिसांनी चार आरोपीना अटक केली आहे. याबाबत मयत मयुरचे वडील सुरेश लक्ष्मण एरंडे ( वय ४७, रा. थुगाव ता.आंबेगाव ) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या खूनप्रकरणी पोलिसांनी गुल्या उर्फ आदित्य नवले, साहील अंबादास सुरवसे, गणेश वाबळे, सोन्या उर्फ आनंद सुधीर नाटे (सर्व रा. मंचर ता.आंबेगाव ) या आरोपींना अटक केली आहे.
पुणे - नाशिक महामार्गावर मंगळवारी (दि. ६ ) रोजी खेडघाटात रस्त्याच्या कडेला मोटार सायकल व एका अज्ञात युवकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळाली. आधी हा अपघात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, खेड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून युवकाच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने गंभीर जखम केली असल्याचे आढळून आले. तसेच युवकाच्या शरीरावर इतर कुठेही मारहाण नसल्याचे व मोटार सायकलचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, मृतदेहाच्या खिश्यात ओळखपत्र मिळाल्यांने पोलिसांनी तपासांची चक्रे फिरली. या युवकाचा हा खून असल्याचे लक्षात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुल्या उर्फ आदित्य नवले यांचे मंचर येथे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. या दुकांनात मयत मयुर कामास होता. मंगळवारी रात्री साडेसात वाजता गुल्या उर्फ आदित्य नवले, साहील अंबादास सुरवसे, गणेश वाबळे,सोन्या उर्फ आनंद सुधीर नाटे (सर्व रा. मंचर ता.आंबेगाव ) यांच्याबरोबर मयुर हा मंचर शहराच्या हद्दीत क्रीडा संकुल येथे दारू पिण्यास गेले होते. दारूच्या नशेत वादावादी होऊन मयुरच्या डोक्यात लाकडी खोऱ्याने मारून एरंडे यांचा खून केला.
या घटनेचा अधिक तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड करत आहे.