दिंद्रूड (जि. बीड) : पैशाच्या कारणाने सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास माजलगाव तालुक्यातील नाखले पिंपळगाव येथे घडली. लक्ष्मण काळे (वय २८) या मयताच्या आईच्या फिर्यादीवरून दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.
दिंद्रूड पोलीस हद्दीतील नाखले पिंपळगाव येथे गजानन दशरथ काळे व लक्ष्मण दशरथ काळे दोघे भाऊ राहतात. या भावंडांत दारूच्या नशेत नेहमीच वाद होत होते. शनिवारी रात्री शंभर रुपयांवरून गजानन व लक्ष्मण यांच्यात हाणामारी झाली. यात डोक्यात मोठी जखम झाल्याने लक्ष्मण काळे (वय २८) याचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच दिंद्रूड पोलीस घटना स्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
दरम्यान, मयत लक्ष्मणची आई कस्तुराबाई काळे हिच्या फिर्यादीवरून आरोपी गजानन काळे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी गजानन दशरथ काळे यास अटक करण्यात आली आहे. तपास दिंद्रूड ठाण्याचे सपोनि. अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, विजेंद्र नाचन आदी करत आहेत.
आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी आरोपी गजानन यास सोमवारी ( दि. १) माजलगाव न्यायालयाने हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सपोनि गव्हाणकर यांनी दिली आहे.