बारामती : बारामती येथील बांधकाम व्यावसायिक दादा साळुंके यांचा दगडाने ठेचून खून झाल्याचे उघड झाले आहे. साळुंके यांचा मृतदेह टेंभुर्णी (ता.करमाळा) परीसरात उजनी धरणाजवळ टाकण्यात आला होता. सोशल मिडीयासह बारामती पोलीसांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.या घटनेमुळे शहर परीसरात खळबळ उडाली आहे.
१२ आॅक्टोंबर रोजी टेंभुर्णी (ता.करमाळा,जि.सोलापुर) पोलीसांना उजनी धरणाजवळ पुणे सोलापुर महामार्ग पुलाखाली अनोळखी पुरषाचा मृतदेह मिळाला. त्याच्या डोक्यात दगड घालुन खून करुन त्याचा मृतदेह पुलाखाली टाकण्यात आला होता. मात्र,त्याच्या शर्टवर बारामतीच्या सिक्वेरा टेलरचा टेलर मार्क होता. यावरुन टेंभुर्णी पोलीसांनी मृत पुरुष हा बारामती येथील असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी आनंद खोबरे यांनी या प्रकरणी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, संबंधित मृतदेह सापडल्यानंतर इतर कोणतेही ओळखीचे पुरावे त्या ठिकाणी आढळले नाहीत. मात्र,बारामती येथील सिक्वेरा टेलर हा टेलर मार्क त्या मृतदेहाच्या शर्टवर आढळला. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांची दोन पथके तातडीने बारामतीला रवाना करण्यात आली.बारामती पोलिसांच्या मदतीने मृतदेहाचे छायाचित्र परीसरात सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले.त्यानंतर तो मृतदेह साळुंके याचाच असल्याचे निष्पन्न झाले.शवविच्छेदन केल्यानंतर शनिवारी (दि १३) सकाळी मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की,टेंभुर्णी पोलीसांनी आणलेल्या मृतदेहाचे छायाचित्रबारामती येथील पोलीस कर्मचारी रमेश केकाण यांनी ओळखले.त्यानंतर केकाण दादा साळुंके याच्या घरी गेले.यावेळी साळुंके हे घरी नव्हते, तसेच त्यांचा मोबाईल देखील बंद होता.त्यानंतर तो मृतदेह साळुंके यांचा असल्याचे निष्पन्न झाले.साळंके हे गुरुवारी (दि ११ ) रात्री घरातुन निघुन गेले होते. पोलीसांनी सांगितल्यावर त्यांच्या क़ुटुंबियांना हा प्रकार समजला.तोपर्यंत साळुंके कुटुंबीय याबाबत अनभिज्ञ होते, असे शिरगांवकर यांनी सांगितले.