वास्को - पाच जणांनी मिळून जबर मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या निकेश लोट या २९ वर्षीय तरुणाचा मंगळवारी (दि.१८) दुपारी मृत्यू झाल्याने या प्रकरणातील पाचही संशयित आरोपी विरुद्ध वास्को पोलीसांनी खूनाचे प्रकरण नोंद केले आहे. दक्षिण गोव्यातील आसयडोंगरी, दाबोळी भागात राहणारा निकेश रविवारी (दि. १६) आपल्या घराच्या जवळच्या परिसरात असताना त्याचा त्या पाच संशयिताशी किरकोळ विषयावरून वाद झाल्यानंतर त्यांनी निकेशची जबर मारहाण केली होती. मारहाणीत निकेश याच्या अंगावरील इतर भागाबरोबरच डोक्यालाही गंभीर जखमा झाल्याची माहीती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली असून त्याची मारहाण करण्यासाठी कुठल्यातरी वस्तूचा वापर करण्यात आला असावा असा संशय पोलीसांकडून व्यक्त केला जात आहे.
या खून प्रकरणाबाबत एका पत्रकाराने माहीती घेण्यासाठी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांना संपर्क काला असता रविवारी रात्री सदर मारहाणीची घटना घडल्याचे त्यांनी कळविले. नवेवाडे, वास्को भागात राहणारे साहील शेख (वय २८) व सयीद शेख (वय २७) हे सख्खे भाऊ तसेच त्यांचा चुलत भाऊ साकीब शेख (वय २६) चारचाकीने त्यांच्या एका मित्राला आसयडोंगरी, दाबोळी भागात सोडण्यासाठी गेले होते. हे तिनही तरुण आसयडोंगरी येथे पोचले व त्यांनी त्यांच्या मित्राला तेथे सोडल्यानंतर त्यांची या भागातच राहणारे अर्जुन नाईक (वय २०) व चंद्रशेखर भगत (वय ४५) या इसमांशी भेट झाली. हे दोन्ही इसम त्या तरुणांच्या परिचयाचे असल्याने ते त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी यावेळी थांबल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली.पाचही जणात चर्चा चालू असताना आसयडोंगरी येथे राहणारा निकेश लोट स्व:ताच्या घराबाहेर उभा होता. यावेळी निकेश व त्या पाच जणात कीरकोळ विषयावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी निकेश याची जबर मारहाण केल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली. या मारहाणीत निकेश गंभीर रित्या जखमी झाल्याने नंतर त्याला उपचारासाठी बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. निकेश याच्या अंगावरील इतर काही भागाबरोबरच त्याच्या डोक्यालाही या माराहणीत गंभीर जखमा झाल्याची माहीती पोलीसांनी दिली. या मारहाण प्रकरणाबाबत पोलीसांना माहीती मिळताच त्यांनी कारवाई करून या प्रकरणातील पाचही संशयिता विरुद्ध गुन्हा नोंद करून सोमवारी दोघांना तर मंगळवारी तिघांना ताब्यात घेऊन नंतर अटक केली.निकेश लोट याच्यावर गोमॅकॉ इस्पितळात उपचार चालू असताना मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाल्याची माहीती पोलीसांनी दिली. यानंतर सदर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचही जणाविरुद्ध पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहीती पोलीसांनी दिली. मारहाण प्रकरणात मरण पोचलेला निकेश लोट याच्या विरुद्ध पोलीस स्थानकावर यापूर्वी गुन्ह्या संदर्भातील काही प्रकरण असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली. निकेश लोट याच्या खून प्रकरणातील संशयितांना पोलीसांनी न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना सात दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश बजावण्यात आल्याची माहीती पोलीसांनी दिली. पोलीस सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.