औरंगाबाद: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या विवाहित मुलाचा गळा दाबून खून केल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचा बनाव करून सुमारे दिड वर्ष पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या मृताच्या वडिलाला अखेर पुंडलिकनगर पोलिसांनी गुरूवारी अटक केली. हा खून २४ एप्रिल २०१८ रोजी रात्री रा. रेणुकानगर, गारखेडा परिसरात झाला होता.
अशोक सदाशिव जाधव (५७,रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) असे आरोपी वडिलाचे नाव आहे. राहुल जाधव (३०,)असे मृताचे नाव आहे. याविषयी पोलीस उपायुक्त डॉ.राहुल खाडे म्हणाले की, २४ एप्रिल २०१८ रोजी राहुल जाधव यास त्याच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात बेशुद्धावस्थेत दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी राहुलला तपासून मृत घोषित केले होते. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण हिंगे यांच्याकडे देण्यात आला होता. त्याच दिवशी राहुलचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घाटीतील डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात राहुलचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे नमूद केले होते. शिवाय त्याच्या शरिरातील काही नमूने तपासणीसाठी न्यायसहायक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. डॉक्टरांच्या शवव्छिेदन अहवालाकडे पोहेकाँ हिंगे आणि तत्कालीन अधिकाऱ्यांनी गांभीर्याने न घेता तपासाची फाईल तशीच ठेवून दिली.
दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी ठाण्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने राहुल जाधवच्या मृत्यूची फाईल तपासली तेव्हा राहुलचा मृत्यू गळा दाबून झाल्याचा स्पष्ट अहवाल वाचून त्यांना धक्काच बसला. त्या घटनेची माहिती तातडीने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रविंद्र साळोखे यांना कळवून त्यांनी तपास सुरू केला. घटनास्थळाची स्वत: पहाणी केली. तेव्हा मृताची आई आणि बहिण रडू लागल्या. राहुलचा खून त्याच्या वडिल अशोक यांनीच केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. राहुलच्या घराजवळ राहणाऱ्या एका महिलेसोबत त्याचे वडिल अशोक यांचे अनैतिक संबंध आहे. या अनैतिक संबंधाला राहुल सतत विरोध करीत असत. यावरून पिता-पुत्रामध्ये भांडण होत. घटनेच्या आदल्या दिवशी त्या महिलेच्या मुलाच्या वाढदिवसाचा खर्च अशोक जाधवने केला होता. यावरून २४ रोजी रात्री अशोक आणि राहुल यांच्यात वाद झाला होता. राहुल आपल्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याचे पाहुन अशोक यांनी त्याचा गळा दाबून खून केला आणि त्याने आत्महत्या केल्याचा बनाव पोलिसांसमोर केला.