नवी मुंबई : घणसोली येथे चार वर्षीय मुलाच्या हत्येची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवानगी केली आहे. अनपेक्षितपणे हातून ही घटना घडल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
घणसोली गाव येथे राहणाऱ्या ॐकार साठे (४) याच्या हत्येची घटना १८ सप्टेंबरला घडली होती. तो घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. काही तास शोधाशोध केल्यानंतर घराच्या मागेच गोणीत त्याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्ह्याची उकल करण्यासाठी रबाळे पोलिसांनी कंबर कसली होती. दरम्यान, ॐकारला ज्या गोणीत गुंडाळले होते, त्या गोणीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. या वेळी तशाच प्रकारची गोणी ॐकार राहत असलेल्या इमारतीमध्येच एका घरात आढळून आली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, उमेश गवळी यांनी तपासाची दिशा ठरवली. ज्या घरात ही गोणी सापडली, घटनेवेळी त्या घरात १७ वर्षांची मुलगी एकटीच होती. परंतु पोलिसांनी विश्वासात घेऊनदेखील ती तपासात सहकार्य करीत नव्हती. अखेर पोलीस निरीक्षक गोरे यांनी सातत्याने त्या मुलीकडे चौकशी करून तिला विश्वासात घेतले असता, २३ दिवसांनी तिने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, ॐकारसोबत तिच्या घरात नेमके घडले काय? यावरचा पडदा तिने उलगडलेला नाही.
बालसुधारगृहात रवानगीॐकार हा नेहमी तिच्या घरी खेळायला जात असे. घटनेच्या दिवशीही तो तिच्या घरी असताना अचानक बेशुद्ध पडला. यामुळे भयभीत झालेल्या या मुलीने त्याला गोणीत बांधून घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीतून खाली फेकले. यामध्येच त्याचा गुदमरून मृत्यू झाला. मात्र तो बेशुद्ध कशाने झाला याचा उलगडा होऊ शकलेला नाही. तर तिने गुन्ह्याची कबुली देताच मंगळवारी तिला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.