सातारा : केस मागे घेत नसल्याच्या कारणातून झिरपवाडी, ता.फलटण गावच्या हद्दीत बंदूकीने गोळ्या घालत तलवारीने एकाचा खून करून पसार झालेल्या शरद अंकुश खवळे (वय ३०) याला स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या (एलसीबी) पथकाने तब्बल सहा वर्षानंतर पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी, झिरपवाडी, ता. फलटण दि. १५ डिसेंबर २०१५ रोजी सकाळी ज्योतीराम चव्हाण व विशाल ढेंबरे हे दोघे निघाले असताना त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. स्वप्नील काकडे, बंटी उर्फ प्रणील काकडे, शरद खवळे, सागर मोरे, सूरज अहिवळे, मंगेश रणदिवे अशी हल्लेखोर संशयितांची नावे होती. या हल्ल्यात ज्योतीराम चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर विशाल ढेंबरे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी संशयितांची धरपकड करुन अटक केली. पुढे याच गुन्ह्यात संशयितांना मोक्काही लावण्यात आला. मात्र मुख्य संशयित शरद खवळे पोलिसांना गुंगारा देत राहिला.
मोक्क्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी सहा वर्षे पसार असल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. पसार असणार्या संशयितांना पकडण्याची मोहीम सुरु असताना शरद खवळे हा बारामती जि.पुणे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सातारा स`थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडले. या घटनेनंतर तो सुरुवातीला एका राज्यात होता. त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात आला. स्वत: ची ओळख व अस्तित्व लपवून तो वास्तव्य करत होता. त्याला फलटण शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस हवालदार शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम यांनी या कारवाईत सहभाग घेतला.