मुंबई : गोवंडी येथे ३ जूनला एका कोरोना बाधित रुग्णाची हत्या करण्यात आली होती. परंतु आता हत्येच्या पाच दिवसानंतर या रुग्णाचा मृतदेह घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शवविच्छेदन करण्याआधीच रुग्णाचा मृतदेह रुग्णालयातून गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मृत इसम मेहराज इजाज अहमद शेख (२३) याच्यावर ३ जून रोजी गोवंडी येथे चाकूने वार करण्यात आले होते. घटनेनंतर त्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तेथे त्याचा मृत्यू झाला. यानंतर राजावाडी रुग्णालय प्रशासनाने या इसमाचा मृतदेह कोरोना चाचणी व शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच्या शवागृहात ठेवला होता. ७ जून रोजी मयत इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर शवविच्छेदन करण्याकामी मृतदेह ताब्यात घेण्याकरिता पोलीस व मृताचे नातेवाईक रुग्णालयाच्या शवगृहात गेले. परंतु तेथे त्यांना मृतदेह शवागृहातून गायब झाल्याचे आढळले. यासंदर्भात मृताच्या नातेवाईकांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी राजावाडी रुग्णालयाच्या शवकक्ष परिचर आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्वाच्या बातम्या
नवऱ्याच्या गर्भवती प्रेयसीला घराबाहेर बोलावलं अन् गोळीच झाडली... व्हिडीओ व्हायरल
पोलीस कर्मचाऱ्याने भाड्याने दिलेल्या घरात सुरु होता कुंटणखाना