कुरुंदा ( हिंगोली ) : नेहमीच्या किरकोळ भांडणाचा राग अनावर झाल्याने लाकडाने जबर मारहाण करून चुलत भावाचा खून केल्याची घटना वसमत तालुक्यातील वापटी येथे २ जुलैच्या रात्री ८.३० वाजता घडली.
वापटी येथील मयत विकास बाबुराव शिंदे वय ५०, यांच्यासोबत चुलत भाऊ अमोल शिंदे याचा नेहमी वाद व्हायचा. मयत हा नेहमी आरोपीची पत्नी व आईसाेबत सतत भांडण करून त्रास देत होता. हा प्रकार नित्याचा झाल्याने त्यातून अनेकवेळा मारहाण देखील झाली.
यादरम्यान २ जुलै रोजी विकास शिंदे हा त्यांच्या आई, वडिलाच्या घरून जेवण करून झोपण्यासाठी स्वतःच्या घरी आला. यानंतर आरोपीसाेबत रात्री ८.३० वाजता जाेराचे भांडण झाले. तसेच नेहमीचे भांडण होऊ लागल्याने राग अनावर झालेला हाेता. यामुळे दाेघात भांडण हाेत आराेपीने विकासच्या शरीरावर जागोजागी बेदम मारहाण केल्याने ताे मरण पावला. खुनाच्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. मयत हा शेती करीत असून, त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. ते अनेक वर्षांपासून माहेरी असल्याने मयत हा गावातील पाण्याच्या टाकी जवळच्या घरात एकटा राहत होता.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी अधिकारी वखारे, सपोनि सुनिल गोपीनवार, उपपोनि सविता बोधनकर, पोना गजानन भोपे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.
फिर्यादी एकनाथ शिंदे यांच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात आरोपी अमोल हरिभाऊ शिंदे याच्या विरूध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा मयताचा चुलत भाऊ आहे.