मुंबई - दादरमध्ये १० रुपयांच्या वादातून भाजी विक्रेत्याने ग्राहकाची हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी भाजी विक्रेता सोनीलाल सुखदेव महंतो (२५) याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंतो हा दादर रेल्वे स्थानक येथील फलाट क्रमांक १च्या बाहेर भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने केलेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या इसमाचे नाव हनीफ मोहम्मद अस्लम सिद्दिकी (३५) असे आहे. ते साकीनाका येथे राहत असून, चर्नी रोड परिसरात कंत्राटी पद्धतीने कारपेंटरचे काम करायचे.सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे काम उरकून ते घरी निघाले. सोबत भाजी घेऊन जावी, म्हणून त्यांनी महंतोकडून भाजी खरेदी केली आणि १० रुपयांची जुनी, फाटलेली नोट दिली. मात्र, महंतोने ती नोट स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. याच वादात महंतोने रागाच्या भरात भाजी कापण्याच्या चाकूने सिद्दिकीवर दोन वेळा वार केले. त्यांच्या छातीवर गंभीर दुखापत करत, महंतोने पळ काढला.स्थानिकांच्या मदतीने सिद्दिकी यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी महंतोविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. महंतो हा सीएसएमटी रेल्वे स्थानकातून टेÑनने पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्यापूर्वीच शिवाजी पार्क पोलिसांनी तेथून त्याला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.जुन्या नोटेमुळे वादसिद्दिकी यांनी दिलेली १० रुपयांची नोट जुनी तसेच फाटकी असल्याने महंतोने ती घेण्यास नकार दिला. त्यामुळेच हा वाद होऊन अखेर त्याचे पर्यवसान हत्येत झाले.
१० रुपयांसाठी भाजी विक्रेत्याकडून ग्राहकाची हत्या, आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 7:03 AM