सातारा : पुणे-बंगळरू राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी, ता. सातारानजिक असणाऱ्या खाणीत मृतअवस`थेत सापडलेल्या युवकाचा अज्ञातांनी खूनच केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित युवक बीड जिल्ह्यातील असल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
अमोल डोंगरे (वय ३५, मूळ रा. बीड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरालगत असणाऱ्या खिंडवाडीतील खाणीत चार दिवसांपूर्वी एका युवकाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला होता. सातारा शहर पोलिसांनी घटनास`थळी धाव घेऊन मृतदेह खाणीतून वर काढला. त्याच्या हातावर राणी असे गोंदले होते. मात्र, तरी सुद्धा त्या युवकाची ओळख पटली नव्हती.
सरतेशेवटी पोलिसांनी सातारा जिल्ह्यात व परजिल्ह्यात मिसिंग व्यक्तींची माहिती घेण्यास सुरूवात केल्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली. हा मृतदेह अमोल डोंगरेचा असून तो बेपत्ता असल्याबाबत सिंहगड पुणे पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांना तपास करण सोपं झालं. अमोल डोंगरे याचा खून कोणी व कशासाठी केला, याचाही पोलिसांनी तपास केला असता पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. खुनाचे पुरावे आणि मारेकऱ्यांना अटक केल्यानंतरच याबाबत अधिकृत माहिती पोलीस देणार आहेत.
खून करून आणून फेकलं..
अमोल डोंगरे याचा खून अगोदरच झाला असावा. मृतदेहाची विल्लेवाट लावण्यासाठी हा मृतदेह रात्रीच्या सुमारास महामार्गालगत असणाऱ्या खाणीत आणून टाकला गेला. मात्र, खाणीतील पाण्यातून मृतदेह वर आल्याने या प्रकरणाचा गाजावाजा झाला.