बीड : तालुक्यातील आहेरवडगाव फाटा शिवारात ४ आॅक्टोबर रोजी कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला. याप्रकरणात कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतानाही बीड ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले आहे. आरोपीला अटक केली असून, याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
आहेरवडगाव फाटा शिवारात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती नागरिकांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यास कळविली. यावरुन ठाणेप्रमुख सपोनि सुजीत बडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे जात पाहणी केली. तसेच महिलेच्या हाडाची वैद्यकीय चाचणी बीड येथे केली. हा मृतदेह १८ ते २२ वर्षे वयोगटातील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
त्यानुषंगाने पोलिसांनी परिसरातील गावांमध्ये या वयोगटातील महिला बेपत्ता आहे याची माहिती घेतली. परंतु हाती काहीही लागले नाही. त्यानंतर पुढे तपास करीत असताना पुणे येथे एक महिला बीड जिल्ह्यात येऊन बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल होता. परंतु त्या महिलेचे वय ५० वर्षाहून अधिक होते. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा बदलून पाहणी केली. यावेळी हा मृतदेह बेपत्ता असलेल्या शारदा आव्हाड या महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हाडांची डीएनए चाचणी करण्यात आली. यामध्ये देखील यास पुष्टी मिळाली.
पोलिसांच्या पुढील तपासात सदरील महिलेचा आर्थिक व्यवहारातून बाळू बाबूराव ओंबसे (रा. पिंपरखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याने गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले. त्याला पोलिसांनी अटक केली असून, बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उप अधीक्षक भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि सुजीत बडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.