पुसद (यवतमाळ) : बांधकाम साईडवर मालवाहू ऑटोतून साहित्य नेऊन टाकले. याचे भाडे का मागितले, या कारणावरून चौघांनी बेदम मारहाण करून मालवाहू ऑटोचालकाचा खून केला. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजता वसंतनगर भागातील मधुकरनगर येथे घडली.
सैयद अली सैयद लाल असे मृत ऑटोचालकाचे नाव आहे. सैयद अली याने सैयद मोहसीन सैयद याचे बांधकाम साहित्य ऑटोतून नेऊन टाकले. याचे भाडे मागण्यासाठी सैयद अली हा सोमवारी सायंकाळी सैयद मोहसीन याच्या घरी गेला. त्यावेळी मोहसीनच्या वडिलांनी त्याला परत पाठविले. नंतर सैयद मोहसीन सैयद बाबू, सैयद बाबू सैयद रहीम, सैयद बाबू सैयद मोहीन, अजहर खान अफसर खान हे चौघे ऑटोचालक सैयद अली याच्या घरी पोहोचले. त्यांनी भाड्याच्या पैशावरून वाद घालत सैयद अली याला मारहाण केली. त्यात लोखंडी फावड्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. सैयद अलीचा मुलगा मोठमोठ्याने ओरडल्याने आरोपी पळून गेले. गंभीर सैयद अली याला नांदेड येथे उपचारार्थ हलविण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शाहिदाबी सैयद अली हिच्या तक्रारीवरून वसंतनगर पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध संगनमताने खून केल्याचा गुन्हा दाखल केला.