देउरवाडा/आर्वी (वर्धा) : आर्वी तालुक्यातील सर्कसपूर-टोना शिवारात वर्धा नदीच्या पात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा आर्वी पोलिसांनी तपास करून अवघ्या तीन दिवसात चौघांना अटक केली आहे. रविवारी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात पोलिसांनी आरोपींना हजर केले असता प्रथम श्रेणी न्यायाधीश त्रिवेणी गायगोले यांनी आरोपीस सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. भारत रामभाऊ काळे (३७) वर्षे रा. धारवाडा तालुका तिवसा जिल्हा अमरावती असे मृतकाचे नाव आहे.
संजय सुभाषराव मेश्राम (४१), अजय सुभाषराव मेश्राम (३०), गुड्डू ऊर्फ समीर संतोषराव साबळे (३५), शरद गुलाबराव नागपुरे (४०) सर्व रा. धारवाडा ता. तिवसा जिल्हा अमरावती, असे या आरोपींचे नावे आहेत. आरोपी आणि मृतक एकाच गावाचे आहेत. मृतक हा ट्रॅक्टर चालविण्याचे व पेंटिंगचे काम करीत होता. संजय मेश्राम आणि अजय मेश्राम यांचा दारूचा व्यवसाय असून समीर साबळे व शरद नागपुरे यांचा शेती व्यवसाय आहे. हे या दारू व्यावसायिकाच्या घरी नेहमीच दारू पिण्यासाठी जात होते त्यामुळे त्यांची मैत्री होती.
२४ मे २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता मृतक भारत काळे आणि अमोल भीमराव काळे दुचाकीने अजय व रमेश मेश्राम यांचे दारूभट्टीवर मोटरसायकलने दारू पिण्यासाठी गेले होते. दारूचे भट्टीवर खाण्यापिण्यावरु या चौघाशी किरकोळ वाद झाला, वाद मिटवण्यासाठी मृतक हा समजावून सांगत होता. शेवटी साक्षीदार अमोल काळे याने मध्यस्थी करून वाद मिटवला. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता सुमारास पुन्हा वर्धा नदीच्या पात्रात हे पाच जण फिरण्यासाठी गेले असताना नावेत परत वाद झाल्याने रागाच्या भरात या चौघांनी मृतकास आर्वी तालुक्यातील टोना गावाचे शिवारात वर्धा नदीच्या पात्रातील पाण्यात बुडून जीवे ठार मारुन रात्री परत घरी गेले. आमचा दोष नसताना मृतक भारत काळे याने आमच्याशी वाद घातला म्हणून त्याला नदीच्या पात्रात बुडवून ठार मारल्याचे या चौघांनी साक्षीदार अमोल काळे याला सांगितले. तसेच, तू कोणाला काही सांगितले, तर तुला पण नदीच्या पाण्यात बुडून ठार मारू अशी धमकी दिल्याने अमोल काळे याने कोणाला काहीही सांगितले नाही.
भारत काळे बेपत्ता असल्याने त्याचे पत्नीने व नातेवाईकांनी शोध घेतला व कुर्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दुर्गवाडा गावातील भोई प्रवीण डाये हा मासे पकडण्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात २ जूनला सर्कसपूर शिवारात गेला असताना त्याला एक पुरुषांचे प्रेत दिसले अशी माहिती मिळाली. त्यानंतर, मृतकाच्या नातेवाईकांनी सर्कसपूर शिवारात वर्धा नदीच्या पात्रात जाऊन पाहिले असता नदीच्या पात्रात काठावर एक कुजलेले प्रेत आढळून आले. त्यामुळे टोना येथील पोलीस पाटील यांनी आर्वी पोलीस स्टेशनला माहिती दिल्याने आर्वी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतकाचे प्रेत नातेवाईक व पत्नी यांना दाखवले असता त्यांनी खात्री केली. यावरून सुवर्णा भारत काळे (३२) यांनी आर्वी पोलिसांत तक्रार दिली असून अपराध क्रमांक 0441/ 21 कलम 302, 201, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात अतुल भोयर पांडुरंग फुगणार करीत आहेत.