डोंबिवली : मासळी विक्रीच्या व्यवसायात वहिनीला मदत करतो या कारणावरून झालेल्या वादात तलवारीने भानुदास उर्फ मुकुंद दत्तू चौधरी यांची हत्या झाल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजता खंबाळपाडा परिसरात घडली. या प्रकरणी वहिनीकडे काम करणाऱ्या हितेश उर्फ काल्या संजय नकवाल याला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
खंबाळपाडा परिसरात राहणारे ५५ वर्षीय भानुदास यांचा मासळी विक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्या वहिनीही मासळी विकतात. वहिनीला हितेश मदत करायचा या कारणावरून भानुदास आणि हितेश यांच्यात वारंवार भांडण व्हायचे. शनिवारीही त्यांच्यात पुन्हा या कारणावरून वाद उफाळून आला. यावेळी भानुदास यांनी त्यांच्याजवळील तलवार बाहेर काढून हितेशला आता तू काम नाही सोडले, तर याच तलवारीने तुझा खात्मा करेन, अशी धमकी दिली.
यावेळी झालेल्या झटापटीत भानुदास यांच्या हातातील तलवार हितेशने हिसकावून घेत, त्यांच्या गळ्यावर, हातावर आणि डोक्यावर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या भानुदास यांचा जागेवरच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच, टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याची चर्चा परिसरात आहे. दरम्यान, हत्या मासळी विक्रीच्या व्यवसायात वहिनीला मदत करतो, यावरून झालेल्या वादातून झाली की, अन्य कारणावरून याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी दिली. अटक केलेला आरोपी हितेश मूळचा राजस्थान येथील रहिवासी आहे. सध्या तो खंबाळपाडा परिसरातील एका चाळीत वास्तव्याला आहे.