लोकमत न्यूज नेटवर्कश्रीरामपूर (जि. अहमदनगर) : बेलापूर येथे जानेवारी २०२१ मध्ये गॅस सिलिंडरच्या झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मायलेकीच्या घटनेला आता वेगळे वळण मिळाले आहे. काही भोंदू बाबांच्या सांगण्यावरून गुप्तधनाच्या लालसेतून या दोघींचा नरबळी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेच्या भावाने याप्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. बेलापुरात ६ जानेवारीला सकाळी गॅसचा प्रचंड मोठा स्फोट झाला होता. यात ज्योती शशिकांत शेलार व नऊ वर्षे वयाची मुलगी नमोश्री शशिकांत शेलार या दोघींचा मृत्यू झाला होता. घटनेत शशिकांत शेलार हे जखमी झाले होते. पोलिसांनी अपघातप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
मयत ज्योती यांचे भाऊ राजेंद्र कचरू नन्नवरे (, मूलानिमाथा, ता. राहुरी) यांनी श्रीरामपूर येथील न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. फिर्यादीवरून शशिकांत अशोक शेलार, अशोक ठमाजी शेलार, लिलाबाई अशोक शेलार, बाळासाहेब अशोक शेलार, कविता बाबासाहेब शेलार, पवन बाळासाहेब खरात, काजल किशोर खरात, किशोर सुखदेव खरात, अनिकेत पाटोळे या एकाच कुटुंबातील आरोपींवर नरबळी तसेच जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह सांगळेबाबा, गागरेबाबा तसेच देवकर गुरू या तिघा भोंदू बाबांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोंदू बाबांच्या सांगण्यावरून सर्व आरोपींनी घरात सिलिंडरचा स्फोट घडवून आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.