मुंबई - दादर ते माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान 9 मार्चला अनिल शेलार यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. महेंद्र सोलंकी उर्फ डीआरएम उर्फ महेश उर्फ दयाराम सोळंकी (३५) आणि गणेश उर्फ गोलू वाघेला (२७) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. महेंद्रच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
धारावी परिसरात राहणारा अनिल हा त्याची आई आणि लहान मुलासोबत राहतो. काही वर्षांपूर्वीच अनिलचे पत्नीसोबत भांडण झाल्यामुळे ती त्याच्यापासून वेगळी रहात होती. दरम्यान अनिल आणि महेंद्र हे दोघे ही एकाच परिसरात रहात असून दोघांवर सराईत गुन्ह्यांची नोंद मुंबईतल्या विविध पोलीस ठाण्यात आहे. या गुन्ह्यांमध्ये महेंद्र तुरूंगात शिक्षा भोगत होता. तर अनिल हा जामिनावर तुरुंगाबाहेर होता. दरम्यान, अनिलचे महेंद्रच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा महेंद्रचा संशय बळावला होता. त्यामुळे तुरुंगामधून नुकताच शिक्षा भोगून बाहेर पडलेला महेंद्र अनिलचा शोध घेत होता. महेंद्र अनिलचा शोध घेण्यासाठी अनिलचा भाऊ सुनिलच्या वडाळा येथील घरी गेला होता. महेंद्रच्या पत्नीस भेटत असल्याचा संशयावरून महेंद्रने दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यानच्या परिसरात झोपलेल्या अनिलच्या डोक्यात लोखंडी सळईने प्रहार करून गंभीर जखमी केले. नंतर उपचारादरम्यान अनिलचा दोन दिवसांनी सायन रुग्णालयात मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी मुंबई सेंट्रल पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या अटक आरोपी व मृताविरोधात मुंबई हद्दीतील शाहूनगर, निर्मलनगर, दादर, सांताक्रूझ, कुर्ला,शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल आहेत.