मेरठ: उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील महाविद्यालयात बीटेकच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. गुंडांनी आधी विद्यार्थ्याला पळवून पळवून मारलं. त्यानंतर चाकूनं २० वेळा सपासप वार करून त्याला संपवलं. या घटनेनंतर महाविद्यालयात खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना धक्का बसला. त्यांनी तातडीनं घटनास्थळ गाठून मुख्य आरोपीसह पाच जणांना ताब्यात घेतलं.
मेरठमधील एमआयईटी इन्स्टिट्यूटमध्ये बुधवारी वरच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी बीटेकच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असलेल्या निखिल तोमरची चाकूनं भोसकून हत्या केली. या हल्ल्यात निखिलचा मित्र आर्यन जखमी झाला. या प्रकरणी मुख्य आरोपी अभिषेक शर्मासह चार विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. एका मुलीवरून दोन गटांमध्ये सुरू असलेल्या संघर्षातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासातून दिली.
एमआयईटी इन्स्टिट्यूटमध्ये सकाळी दहाच्या सुमारास विद्यार्थी वर्गात जात होते. बागपत जिल्ह्याच्या शिकोहपूर गावचा रहिवासी असलेला निखिल काही विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालय परिसरात बोलत उभा होता. बीटेकच्या तिसऱ्या वर्गात शिकणारे अभिषेक वर्मा, अंकित शर्मा, विभोर यांच्यासह काही जण तिथे पोहोचले. त्यांनी निखिलला घेरलं आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. अभिषेकनं निखिलच्या छाती, पोट, मान आणि डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे.
निखिल आरडाओरड करत काही अंतर धावला. मात्र बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याचा आक्रोश ऐकून महाविद्यालयाचे सुरक्षारक्षक तिथे पोहोचले. त्यांनी अभिषेक आणि त्याच्या तीन मित्रांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकेतून निखिलला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. निखिलच्या शरीरावर चाकूनं २० वार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.