लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळील शॉपिंग सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री गोळी झाडून व्यापारी शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या फेरीवाल्यांच्या जागेच्या वादातून घडल्याचे पोलिस तपासात समोर आले. मीरामणी हॉटेलकडे जाणाऱ्या जिन्याजवळ शुक्रवारी रात्री शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी ऊर्फ सोनू आणि इसा इब्राहिम शेख बोलत उभे होते. त्यावेळी शम्सवर गोळी झाडत त्याची हत्या करण्यात आली. तेव्हा इसा हल्लेखोरांना पकडण्यासाठी मागे धावला. तोच हल्लेखोराने त्याच्यावर पिस्तूल रोखली. मात्र त्यातील मॅगझिन खाली पडल्याने हल्लेखोर गोळी न झाडताच पळून गेला. पोलिसांना मॅगझिन तसेच हत्येचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09
इसाच्या फिर्यादीवरून नयानगर पोलिसांनी युसूफ मन्सूर आलम आणि अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. युसूफ हा स्टेशन समोरच्या शांती सागर हॉटेलजवळ फूटपाथवर बाकडा लावतो. त्याच फूटपाथवर कपडे विक्री करणाऱ्या इसा शेख सोबत सोनूचा भागीदारीत व्यवसाय होता. अशात १ जानेवारी रोजी युसूफ याने ही माझी जागा असून इकडे धंदा लावायचा नाही असे धमकावले होते.
युसूफ आणि सोनू यांच्यातही वाद
युसूफ आणि सोनू यांच्यातदेखील याठिकाणी धंदा लावण्यावरून काही महिन्यांपासून वाद सुरू होता. याशिवाय शांती शॉपिंग सेंटरमध्ये युसूफने गाळा भाड्याने घेतला होता. शेजारच्या ए ४० या गाळेधारकासोबत दुकानाच्या बाहेर सामान लावण्यावरून दोघांत वाद व्हायचा. नोव्हेंबरमध्ये या वादातून युसूफवर गुन्हा दाखल केला गेला होता. त्यात सोनू हा युसूफच्या विरोधातील साक्षीदार होता.