वर्धा : हत्येचा बदला हत्येनेच घेतल्याची धक्कादायक घटना कारंजा शहरातील खर्डीपुरा भागात सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी एका महिलेसह दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नाकर सावरकर (५२) असे मृताचे नाव आहे.
रत्नाकर सावरकर हे लोहरी सावंगा येथील मूळ रहिवासी असून सध्या ते कारंजा शहरात पत्नीसह राहायचे. गावातील घराशेजारील चाफले कुटुंबासोबत त्यांचा जागेच्या कारणावरून वाद असून याच वादातून मृताच्या कुटुंबीयांनी आरोपी बाली ऊर्फ सविता चाफले यांच्या भावाची दीड वर्षापूर्वी हत्या केली होती. या प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यावर मृत कारंजा येथे किरायाच्या घरात रहायला आला. मृताचा मुलगा गौरव सावरकर हा रविवारी जामिनावर सुटला. गौरव सावरकर हा सुटून आल्यावर कारंजा येथे घरात झोपून असल्याचा अंदाज बांधून मारेकऱ्यांनी सशस्त्र हल्ला करून झोपून असलेल्या रत्नाकरला गंभीर जखमी करून पोबारा केला. गंभीर जखमी अवस्थेत ते घराबाहेर पडल्यावर जमिनीवर पडले. शिवाय त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बाली ऊर्फ सविता चाफलेसह दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.