चाकण - प्रेमाच्या त्रिकोणातून चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी रोडवरील रासे गावच्या गायरानात एकाचा खून करण्यात आला असून याप्रकरणी आज रात्री पाच जणांवर आज खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचपैकी एका आरोपीस चाकण पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी दिली. आरोपींनी अपघाताचा बनाव करून खून केलेल्या व्यक्तीस संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल मध्ये सोडून पलायन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना शुक्रवारी १४ सप्टेंबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आळंदी रोड वरील रोटाई मंदिरापासून पुढे फॉरेस्टलगत असणाऱ्या रासे गावच्या हद्दीतील गायरान जागेत घडली. नामदेव नागोराव जाधव ( वय ३२, रा. डोंगरवस्ती, निघोजे, ता.खेड, जि.पुणे, मुळगाव तारदवाडी, पो. येवती, ता.मुखेड, जि. नांदेड ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद नामदेवच्या भाऊ व्यंकट नागोराव जाधव ( वय २८, रा. विमाननगर, पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी अक्षय दीपक सोनवणे ( रा. चिंबळी, ता.खेड, जि.पुणे ), अविनाश उर्फ अविराज रोहिदास देडे ( वय २२, रा. टॉवर जवळ, गणपती मंदिराच्या पाठीमागे, आदर्षनगर, मोशी, पुणे ), आदित्य मुऱ्हे ( रा. मुर्हेवस्ती, कुरुळी, ता.खेड, जि.पुणे ), महादेव भाग्यवंत ( रा.मोशी, पुणे ), आकाश गायकवाड ( रा. धावडेवस्ती, भोसरी, पुणे ) या पाच जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अविनाश उर्फ अविराज रोहिदास देडे यास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश याने घडलेला सर्व प्रसंग पोलिसांसमोर कथन केला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, मयत नामदेव हा सायली इंटरप्रायजेस मध्ये सुपरवायझर चे काम करीत होता व सुपरजित कंपनीला मॅनपॉवर सप्लाय करीत होता. नामदेवचे दीपाली नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असूनही प्रेमसंबंधाची माहिती न देता नात्यातील मुलीशी त्याने लग्न केले. त्याच्या बायकोला दिपालीशी असणारे प्रेमसंबंध कळल्याने त्यांनी फारकत घेतली होती. व दिपालीशीही त्याचे पटत नव्हते. त्यानंतर नामदेवचे हर्षदा नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. परंतु हर्षदा वर अक्षय सोनवणे याचेही प्रेम होते. व अक्षयला हर्षदाशी लग्न करायचे होते. नामदेवला वारंवार समजावून सांगुनहि त्यांचे प्रेमसंबंध सुरूच होते. त्यामुळे अक्षय हा हर्षदावरून नामदेव यास नेहमी त्रास व धमकी देत होता. आणि यातूनच त्याने नामदेवचा काटा काढण्याचे ठरविले. शुक्रवारी ( दि. १४ ) रोजी दुपारी एक वाजता यातील आरोपींनी नामदेवचा कायमचा काटा काढण्यासाठी चिंबळी फाट्यावर बोलावून घेतले. तेथून सर्वानी गोड बोलून आळंदी रोडवरील जंगल भागात नेले. व रासे गावच्या हद्दीत आरोपींनी नामदेवला काठीने व चामडी पट्ट्याने मारहाण केली. नामदेव बेशुद्ध पडला असता त्याला दुचाकीवर टाकून त्याचा अपघात झाला असल्याचे सांगून त्यास सायंकाळी पावणे सातच्या सुमारास भोसरी येथील संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल मध्ये सोडून सर्वानी पलायन केले. हे सर्व आरोपी हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार पुढील तपास करीत आहेत.
प्रेमाच्या त्रिकोणातून खून, चौघांवर गुन्हा दाखल, एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 9:26 PM