यवतमाळ : येथील नागपूर मार्गावर नर्सरीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचा खून केल्याची घटना तब्बल एक महिन्यानंतर उघडकीस आली आहे. सुरुवातीला अपघात झाला असे समजून जखमीला उपचारार्थ नागपूर येथे दाखल केले होते. उपचारात मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्यातील अहवालातून अपघात नसून खून झाल्याची बाब पुढे आली. या प्रकरणी सोमवारी रात्री शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.
अब्दुल रहीम विलास सरोदे (३८) रा.अमननगर डोर्ली असे मृताचे नाव आहे. अब्दुल हा नागपूर मार्गावर तीन जणांच्या भागिदारीत नर्सरीचा व्यवसाय करत होता. २७ सप्टेंबरला सायंकाळी ८.३० वाजता अब्दुल रहीम याला गंभीर अवस्थेत यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो बेशुद्ध असल्याने तेथून नागपूर येथे हलविण्यात आले. दरम्यान, १ ऑक्टोबरला अब्दुलचा नागपूर येथे मृत्यू झाला. या अहवालावरून यवतमाळ शहर पाेलिसांनी १२ ऑक्टोबरला अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती. आता अब्दुलचा मृत्यू अपघातामुळे नव्हे तर गंभीर स्वरूपाच्या मारहाणीने झाला हे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले आहे. या प्रकरणी त्याची पत्नी यास्मीन परवीन अब्दुल रहीम हीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मजुरीचा वाद भोवलाअब्दुल रहीम याने घाटंजी तालुक्यातील नर्सरीवर काम करण्यासाठी मजूर आणले होते. घटनेच्या दिवशी त्यांच्यात मजुरीच्या पैशातूनच वाद झाला होता. त्या दिशेने यवतमाळ शहर पोलीस तपास करीत आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे ठाणेदार धनंजय सायरे यांनी सांगितले.