जळगाव : ११ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य करून त्याचा खून करणाऱ्या यश उर्फ गोलू चंद्रकांत पाटील (वय २१,रा.डांभुर्णी, ता. यावल) याला न्यायालयाने मरेपर्यंत कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांनी सोमवारी हा निकाल दिला. दरम्यान, गुन्हा घडल्यापासून तर शिक्षा होईपर्यंत आरोपीकडे कुटूंब फिरकलेच नाही. गुन्हा घडल्यापासून तो कारागृहातच आहे. यश याच्यावर अशाचे प्रकारचे तीन गुन्हे दाखल असून, एका खटल्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भोकर येथे ११ वर्षीय बालकाचा १६ मार्च २०२० रोजी एका शेतात कुजलेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात यश याला अटक करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी तपास करून १० जून २०२० रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी १२ साक्षीदार तपासले. त्यात पंच प्रकाश गायकवाड, सुकलाल सैंदाणे, कृष्णा दमाहे, ज्यांच्या शेतात प्रेत आढळले ते राजेंद्र सोनवणे, राघवेंद्र कापसे, ज्यांच्या दुकानावरून आरोपी गुटख्याची पुडी घेतली ते शेखर सूर्यवंशी, ज्याच्या गाडीवर बर्फाचा गोला खाल्ला ते अनिल भोई, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, मयताचे वडील, डॉ. नीलेश देवराज, ग्रामसेवक नितीन चौधरी व तपाधिकारी रविकांत सोनवणे यांचा समावेश आहे. सूर्यवंशी व भोई या दोघांनी आरोपी व मृताला सोबत जाताना शेवटचे पाहिले होते.
डीएनए ठरला महत्त्वाचा पुरावाया घटनेत मृताचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, शिवाय डोळाही काढला होता. त्यामुळे मुलाची ओळख पटविण्यासाठी मुलगा व त्याचे वडील या दोघांचे डीएनएसाठी नमुने घेऊन ते न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविले असता ते जुळून आले. त्यानंतर आरोपी यश याचे डीएनएसाठी नमुने घेण्यात आले होते. त्यात अनैसर्गिक कृत्य केल्याचे उघड झाले. त्याशिवाय घटनास्थळावर निरोध व त्यात वीर्य आढळून आले होते, तेदेखील तपासण्यात आले.