बंगळुरू - बंगळुरूच्या कोरमंगला येथे राहणाऱ्या हॉस्टेलमधील २४ वर्षीय बिहारच्या युवतीच्या हत्येतील आरोपीला मध्य प्रदेशातून अटक केली आहे. या आरोपीचं नाव अभिषेक असून ज्यानं २३ जुलैच्या रात्री कृतीकुमारीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर मध्य प्रदेशला पसार झाला. कृतीची हत्या का आणि कशासाठी केली याबाबत बंगळुरू पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.
२४ वर्षीय युवती एका खासगी कंपनीत काम करत होती. मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास वीआर लेआऊट येथील हॉस्टेलमध्ये हल्लेखोर घुसला आणि त्याने तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कृतीवर खोलीत जात चाकूने गळा कापला. या घटनेत युवतीचा जागीच मृत्यू झाला. व्येंकटरेड्डी लेआऊट येथील भार्गवी स्टेइंग होम्स फॉर लेडिज इथली ही घटना आहे. हे ठिकाण दक्षिण पूर्व पोलीस उपायुक्त कार्यालय आणि कोरमंगला पोलीस ठाण्यापासून अवघ्या १ किमी अंतरावर आहे. जी युवती हल्ल्यात मृत्युमुखी पडली तिची मैत्रिण हल्लेखोराची प्रेयसी होती.
प्राथमिक तपासात हल्लेखोर ओळखीचा व्यक्ती होता. मात्र या घटनेमुळे हॉस्टेलच्या प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. मूळची बिहारची असणारी २४ वर्षीय कृती बंगळुरुतील खासगी कंपनीत काम करायची. या हल्ल्यावेळी आरोपी पीजी हॉस्टेलमध्ये एक बॅग घेऊन शिरतो. काही वेळात कृती दरवाजा उघडते तेव्हा तिचे केस पकडून तो बाहेर खेचतो आणि चाकूने तिच्यावर हल्ला करतो. पीडित युवती हल्ल्याचा विरोध करते परंतु आरोपी तिच्यावर चाकूने वार करत होता. अखेर तिच्या गळ्याला चाकूने कापतो हा सगळा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
दरम्यान, हॉस्टेलमध्ये जोरजोरात आरडाओरड सुरू झाल्याने तिथे अन्य मुली येऊन पोहचताच, परंतु तिला कुणीही वाचवू शकले नाही. पीडित मुलगी बराच वेळ मदत मागत राहिली परंतु तिच्या मदतीसाठी कुठलीही युवती पुढे आली नाही. ही युवती रक्ताच्या थारोळ्यात मदतीसाठी विनवणी करत राहिली आणि तिथेच जीव सोडला. मंगळवारी रात्री ११.१० ते ११.३० या वेळेत हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला असं पोलिसांनी सांगितले.