नवी मुंबई : बारबाहेर दबा धरून बसलेल्या दोघांनी केलेल्या हल्ल्यात बार कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना जुहूगाव येथील किनारा बार येथे गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. बारचा मॅनेजर समजून हल्लेखोरांनी हल्ला केल्याची शक्यता वर्तविली जात असून, या प्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बारमध्ये सफाई काम करणारा मोंटू यादव (२६) हा काम उरकून घरी चालला होता. बारपासून काही अंतरावर तो बसची वाट पाहत उभा राहिला. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुकेशने प्रतिकार केल्याने त्याने धारदार शस्त्राने त्याच्या छातीत भोसकले. यानंतरही त्यांच्यात झटापट सुरू होती.
मदतीसाठी मुकेश आरडाओरडा करताच बारचा सुरक्षारक्षक दिनेश यादव मदतीसाठी धावून आला. त्या हल्लेखोराने त्याच्यावरही वार करून मोटारसायकलवरून पळ काढला. या घटनेनंतर दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मुकेशचा मृत्यू झाला. तर, दिनेशवर उपचार सुरू आहेत.
छातीत घुसवले हत्यारमुकेशवर हल्ला करणाऱ्यांनी वार इतक्या ताकदीने केला आहे की त्याच्या छातीवर खोलवर जखम झाली आहे. त्यामुळे हल्लेखोर नशेत होते का, यासोबतच त्यांचा हल्ल्याचा नेमका उद्देश काय, असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, पोलिसांचा त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. बहिणीच्या लग्नासाठी जाणार होता गावी मुकेश हा मूळचा झारखंडचा असून, त्याच्या बहिणीचे काही दिवसांनी लग्न आहे. त्यासाठी तो शुक्रवारपासून सुटीवर जाणार होता. त्यापूर्वी ही घटना घडल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मॅनेजर समजून हल्ला?मुकेश हा बोनकोडे परिसरात राहणारा असून, नेहमी बारची साफसफाई केल्यानंतर बारमधील अन्न, फळे बॅगमध्ये घेऊन जात असे. गुरुवारी पहाटेदेखील तो बॅगमध्ये फळे घेऊन चालला होता. घटनेनंतर पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासात संशयित मोटारसायकलची माहिती पोलिसांच्या हाती लागली.