ठाणे : आपल्या विवाहित मुलीला पूर्वीच्या मैत्रीवरून त्रास देणाऱ्या मनोजकुमार दास (२४, मूळ रा. ओडिसा) या हॉटेल कर्मचाऱ्याचा खून केल्याप्रकरणी मायलेकासह चौघांना कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. चौघांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मनोजकुमार याचा शुक्रवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे आधी खुनाचा प्रयत्न, असा गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणात पोलिसांनी खुनाचे कलम वाढविल्याची माहिती कोपरी पोलिसांनी शनिवारी दिली.
कोपरीतील ट्विन्स बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये २९ मे रोजी रात्री ९.३० ते ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. मनोजकुमार हा कळवा येथील एका ४५ वर्षीय महिलेच्या विवाहित मुलीचा पूर्वीचा मित्र होता. तिलाही दोन मुले आहेत. असे असूनही तो या मुलीला पूर्वी असलेल्या मैत्रीच्या बहाण्याने त्रास देत होता. वारंवार समज देऊनही तो ऐकत नसल्यामुळेच कळव्यातील या मुलीची ४५ वर्षीय आई, तिचा २८ वर्षीय मुलगा आणि मुलाचे दोन मित्र अशा चौघांनी २९ मे रोजी हॉटेलमध्ये येऊन मनोजकुमारला गाठले. तिथे त्यांच्यात बाचाबाची झाले. त्यानंतर किचनमध्ये जाऊन त्याला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांसह हवा भरण्याच्या पंपानेही जबर मारहाण केली. त्यात जखमी झाल्याने त्याला सुरुवातीला ठाण्यात नंतर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात त्याला दाखल केले होते.
६ जूनपर्यंत पोलीस कोठडीसुरुवातीला खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा ३० मे रोजी कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाला. पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर आणि सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांच्या पथकाने यातील आरोपी महिला आणि तिच्या मुलाला ३१ मे रोजी सकाळी, तर उर्वरित दोघांनाही रात्री अटक केली. दरम्यान, ३ जूनला जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मनोजकुमार याचा मृत्यू झाला. त्यामुळे यात खुनाचे कलम वाढविले आहे. चारही आरोपींना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणेन्यायालयाने दिले आहेत.