नवी मुंबई - उरण येथे राहणाऱ्या २० वर्षीय यशश्री शिंदे गुरुवारी बेपत्ता झाली होती. तिचा शोध पोलिसांकडून सुरू होताच त्यातच शुक्रवारी रात्री उशीरा एका पेट्रोल पंपाजवळील निर्जनस्थळी युवतीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह यशश्रीचा असल्याचं निष्पन्न झालं. या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करणारे डॉक्टरही तिची अवस्था पाहून हादरले. यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टला मोठी जखम होती. शरीरावर अनेक वार केले होते. तिचा निर्घृण खून केल्याचं उघड झालं.
या घटनेत दाऊद शेख नावाच्या आरोपीची ओळख पटली असून त्याने यशश्रीवर लैंगिक अत्याचार केले होते. वयाच्या १५ व्या वर्षी यशश्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला पॉक्सो अंतर्गत जेल झाली होती. जेलमधून बाहेर येऊन त्याने यशश्रीसोबत जे केले ते ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल. यशश्री शिंदे कॉमर्सचं शिक्षण घेत होती. शिक्षणासह ती खासगी कंपनीत डेटा ऑपरेटर म्हणून काम करायची. गुरुवारी ती आई वडिलांना बाहेर जाते सांगून घरातून निघाली आणि तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. रात्री उशीरापर्यंत मुलगी परतली नाही तेव्हा वडिलांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली.
शुक्रवारी रात्री उरण पोलीस स्टेशनच्या पथकाला एक कॉल आला. त्यात कोटनाका परिसरात रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात मुलीचा मृतदेह पडला असून कुत्रे तिच्या शरीराचा चावा घेत होते. कुत्र्यांमुळे मुलीचा चेहरा विद्रुप झाला होता. तिच्या खांद्यावरील मांसही कुत्र्यांनी खाल्लं. तिच्या कमरेवर आणि पाठीवर चाकूचे ३ वार होते. यशश्री शिंदे बेपत्ता प्रकरण पाहता तिच्या आई वडिलांना बोलवण्यात आले. तेव्हा मुलीचे कपडे आणि तिच्या शरीरावर टॅटूने तिची ओळख पटली. पीडित मुलीच्या आई वडिलांनी संशयित म्हणून दाऊद शेखचं नाव पोलिसांना सांगितले.
दाऊद शेख हा व्यवसायाने ड्रायव्हर असून २०१८ मध्ये त्याने १५ वर्षीय यशश्री शिंदेला पाहिले आणि तिला टार्गेट करणं सुरू केले. तिला आपल्या जाळ्यात ओढत २०१९ मध्ये यशश्रीचं शारिरीक शोषण केले. कुटुंबाने दाऊदविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक करून जेलला पाठवले. मात्र जेलच्या बाहेर निघाल्यानंतर दाऊद पुन्हा यशश्रीचा पाठलाग करू लागला. दाऊदनेच तिचं अपहरण करून हत्याचा केल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला आहे. आरोपी कर्नाटकात राहणारा असून त्याने मोबाईल बंद केला आहे. तो फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विविध टीम तयार केली आहे.
नागरिकांमध्ये संतापाची लाट, उरण बंदची हाक
यशश्रीच्या मारेकऱ्याला शोधण्यात पोलिसांना अपयश आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यशश्री शिंदे हत्येच्या निषेधार्थ उरण बंदची हाक देण्यात आली आहे. उरण मार्केटमध्ये आज लॉँगमार्च काढण्यात आला. त्यात शेकडो नागरिक सहभागी झाले.