गारगोटी : पारदेवाडी (ता. भुदरगड) येथे जमीन कसण्याच्या वादातून झालेल्या मारामारीत गंभीर जखमी झालेल्या ज्ञानदेव संतू मोरसे (वय ७१)यांचा उपचारादम्यान मृत्यू झाला. याबाबतची तक्रार मुलगा कृष्णात ज्ञानदेव मोरसे यांनी भुदरगड पोलिसांत दिली आहे.
ज्ञानदेव मोरसे आणि त्यांचा चुलत भाऊ ज्ञानदेव बच्चाराम मोरसे यांच्या कुटुंबात शेती कसण्यावरून वाद आहे. या जमिनीच्या वादातून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यावेळी स्थानिक पातळीवर तो वाद मिटविण्यात आला होता. पण वाद पूर्णपणे मिटला नसल्याने पुन्हा मारामारी झाली. बुधवारी( दि.१८) रोजी रात्री भावकीतील लग्नाची वरात संपल्यानंतर साडे अकराच्या सुमारास ज्ञानदेव संतू मोरसे हे त्यांची पत्नी मुलासह त्यांच्या घराच्या दारात उभे असताना ज्ञानदेव बचाराम मोरसे, सुरज संजय मोरसे, संजय बचाराम मोरसे, कुमार बाळासो मोरसे हे तेथे गेले त्यापैकी ज्ञानदेव बच्चाराम मोरसे याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने ज्ञानदेव संतू मोरसे यांच्या डोक्यात पाठीमागील बाजूस मारहाण करून जखमी केले. बाकीच्या सर्वांनी त्यांना आणि त्यांचा मुलगा कृष्णात मोरसे याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर, जखमींना गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ज्ञानदेव हे गंभीर जखमी असल्याने त्यांनी प्रथमोपचार करून गुरुवार (दि.१९) रोजी पुढील उपचाराकरीता सीपीआर हॉस्पिटलकोल्हापूर येथे दाखल केले. गेले दहा दिवस उपचार सुरू असताना रविवारी संध्याकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संशयित आरोपी फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलीस शोध मोहीम राबवित आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा. विवाहीत मुलगी, सून ,दोन नाती, एक नातू असा परिवार आहे.