नाशिक : नाशिकरोड भागातील एकलहरा रोड येथील स्वस्तिक फर्निचर कारखान्याचे मालक शिरीष सोनवणे यांचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार १० सप्टेंबर रोजी समोर आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल २१ दिवस संशयितांचा माग काढून गुरुवारी तीन संशयितांना अटक केली असून, यात वेल्डिंग व्यावसायिक सोमनाथ रामचंद्र कोंडाळकर (३६ रा. कालिका मंदिरमागे, नाशिक) व प्रवीण आनंदा पाटील (२८, रा. घुगे मळा, इच्छामणी मंदिर यांंच्यासह तिसऱ्या कारचालकाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
व्यावसायिक शिरीष सोनवणे यांच्या खुनातील दोन्ही संशयित आरोपींचाही अंबड गाव, नाशिक येथे बेंच व इतर वस्तू बनविण्याचा व्यवसाय आहे; परंतु त्यांना फॅब्रिकेशन व्यवसायातील स्पर्धेमुळे मोठ्या ऑर्डर मिळत नव्हत्या. तुलनेत मयत यांचा बेंच बनविण्याचा मोठा कारखाना असल्याने ते कमी दरात ऑर्डर घेत होते. तर आरोपींना मागील ३ महिन्यांपासून कोणतीही ऑर्डर न मिळाल्याने ते आर्थिक विवंचनेत फसले होते. त्यांच्याकडे वर्कशॉपचे व राहते घराचे भाडे देणेदेखील चार महिन्यांपासून थकित होते. त्यामुळे त्यांना पैशांची नितांत आवश्यकता असल्याने त्यांनी मयत यास धमकावून त्यांच्याकडून कामाची ऑर्डर घेण्यासाठी त्यांचे अपहरण केले.
मयत यांनी आरोपींना विरोध केल्याने त्यांनी मयतास जीवे मारल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपी क्रमांक ३ हा वाहनचालक असून, आरोपी सोमनाथ कोंडाळकर व प्रवीण पाटील यांनी गुन्हा करतेवळी वापरलेली स्विफ्ट डिझायर चालवण्यासाठी तो सोबत असल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, तिन्ही संशयितांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असून, त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"