मंगेश कराळे
नालासोपारा :- बेपत्ता असलेल्या २८ वर्षीय मेकअप आर्टिस्ट तरुणीची गुजरात राज्यात हत्या झाल्याचे उघड झाल्याने वसईत खळबळ माजली आहे. तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून वलसाड येथील खाडीत फेकून देण्यात आला आहे. नायगाव पोलिसांनी सोमवारी रात्री हत्या, हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी मनोहर शुक्ला (४३) याला अटक करून गुन्ह्याच्या पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
नायगांवच्या सनटेक इमारतीत राहणारी नयना महंत (२८) ही तरुणी सिनेमात मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची. १२ ऑगस्टपासून ती बेपत्ता असल्याने तिच्या बहिणीने १४ ऑगस्टला मीसिंगची नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस तपासात नयनाची हत्या तिचा पूर्वीचा प्रियकर मनोहर शुक्ला (४३) याने हत्या केल्याचे उघड झाले आहे. तिची पाण्यात बुडवून हत्या केली आणि मृतदेह सुटकेस मध्ये टाकला. ती सुटकेस आरोपीने गुजरातच्या वलसाड येथील खाडीत टाकून दिला होता. वलसाड पोलिसांना तिचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी मनोहर शुल्काला मंगळवारी सकाळी अटक केली आहे. तर त्याची पत्नीचा गुन्ह्यात सहभाग असल्याने तिलाही अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले - श्रींगी यांनी लोकमतला दिली.
नयना महंत ही पूर्वी वसईला रहात होती. सिनेसृष्टीत काम करणार्या आरोपी मनोहर शुक्ला बरोबर तिचे प्रेमसंबंध होते. मात्र तो विवाहित असल्याचे समजल्यानंतर तिने हे संबंध तोडले आणि त्याच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी शुक्ला तिच्यावर दबाव टाकत होता. याच कारणावरून जीवे ठार मारून तिच्या शरीराचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने विल्हेवाट लावल्याने नायगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.