यवतमाळ - विवाहित महिलेशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या एकाचा दोघांनी चाकूने भोसकून खून केला. ही घटना पुसद तालुक्यातील वनवार्ला येथे बुधवारी सायंकाळी घडली. घटनेतील आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी तपास पथके नियुक्त करून गुरुवारी सकाळी एका आरोपीला अटक केली. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र व पसार आरोपीचा शोध घेतला जात आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
अन्सार शेख मुसा (४०, रा. वनवार्ला) याने गावातीलच विवाहित महिलेशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. तिला फूस लावून हैदराबाद येथून पळवून आणले. अन्सार शेख हा विवाहित असताना त्याने हे कृत्य केले. याचा राग आरोपी शेख मेहबूब शेख अजगर (२०), शेख नाजीर शेख अजगर (३०) या दोघांच्या डोक्यात होता. वारंवार समजूत काढूनही वर्तन सुधारत नसल्याने आरोपींनी संधी शोधली. बुधवारी सायंकाळी अन्सार शेख एकटा फिरत असताना त्याच्यावर चाकूने वार केले. यात तो जागीच ठार झाला. घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलिसांनी फिर्यादी ताहेरा बेगम शेख अन्सार यांच्या तक्रारीवरून कलम ३०२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांनी गुन्ह्याच्या तपासावर लक्ष केंद्रित केले. पुसद व स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने रात्रीतून आरोपींचा नागपूर, आर्णी, पुसद, खंडाळा या परिसरात शोध घेतला. यातील शेख मेहबूब शेख अजगर हा पुसद तालुक्यातीलच बान्सी येथे पोलिसांच्या हाती लागला. दुसरा आरोपी शेख नजीर शेख अजगर हा पसार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर अधीक्षक डॉ. के.ए. धरणे, एसडीपीओ पंकज अतुलकर, एलसीबी प्रमुख प्रदीप परदेशी, ठाणेदार मोतीराम बोडखे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक गणेश इंगोले, जमादार मकसूद शेख, संदीप राठोड, गजानन फोपसे, धम्मानंद केवटे, चंदन जाधव, दानिश शेख, योगेश आळणे यांनी केली.