उत्तर प्रदेशातील संतकबीरनगर इथं सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या महिला महासचिव नंदिनी राजभर यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. नंदिनी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घरी आढळून आला ज्यामुळे परिसरात खळबळ माजली. नंदिनीच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी धरणे आंदोलन केले असून मृतदेह ताब्यात घेण्यात आलेल्या पोलिसांवर आंदोलक भडकले. गावकरी आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. रात्री उशिरा पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढून मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला.
या घटनेबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत. नंदिनी राजभर रविवारी भाजपा कार्यालयात गेल्या होत्या. त्याठिकाणी एक बैठक संपवून संध्याकाळी ४ वाजता त्या घरी परतल्या. त्यांचे पती बाहेर गेले होते. तर ७ वर्षीय मुलगाही घराबाहेर खेळायला गेला होता. संध्याकाळी ५ वाजता शेजारील महिला काही कामानिमित्त नंदिनी यांच्या घरी गेल्या. त्यावेळी नंदिनी यांच्या घरचा दरवाजा उघडताच नंदिनी राजभर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेल्या दिसल्या.
मृतदेह पाहताच महिला किंचाळली, महिलेचा आवाज ऐकून आसपासचे लोकही धावले. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना ही माहिती कळवली. कोतवाली प्रभारी बृजेंद्र पटेल यांच्यासह एएसपी शशी शेखर सिंह घटनास्थळी पोहचले. या घटनेनंतर सुभासपा अध्यक्ष ओमप्रकाश राजभर नंदिनी यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. नंदिनी राजभर यांच्या हत्येनंतर गावकऱ्यांमध्ये संताप पसरला. पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झटापट झाली. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत असं गावकऱ्यांनी भूमिका घेतली.
नंदिनी राजभर या भागात परिचित नेत्या होत्या. त्या त्यांचे सासरे यांच्यासाठी न्यायाची लढाई लढत होत्या. याच प्रकरणात नंदिनी यांना धमक्या मिळत होत्या. एक आठवड्यापूर्वी नंदिनी यांच्या सासऱ्यांचा रेल्वे ट्रॅकवर मृतदेह सापडला होता. त्यांची हत्या कुणी केली याबाबत पोलीस तपास सुरू होता. जमिनीच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली त्यानंतर त्या हत्येला आत्महत्येचं स्वरुप दिले असा आरोप होत होता.