संतोष वानखडे, वाशिम: अनसिंग (ता.वाशिम) येथील बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह पुसद तालुक्यातील उडदी शेत शिवारात १४ ऑक्टोबरला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. निर्घूण हत्या झाल्याचे समोर आले असून, हत्येमागील कारण अस्पष्ट आहे. दरम्यान, मागील पाच दिवसांत जिल्ह्यात हत्येची तिसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. शेख सलमान शेख बिस्मिल्ला (२७) असे मृतकाचे नाव आहे.
मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील सहायक शिक्षक दिलीप धोंडूजी सोनुने यांना पेट्रोल टाकून जीवंत जाळून टाकल्याच्या घटनेची शाई वाळत नाही; तेच एरंडा येथे शेतकऱ्याची हत्या झाल्याची घटना घडली. या घटनेला दोन दिवस उलटत नाही; तेच पुन्हा अनसिंग येथील युवकाची हत्या झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) उघडकीस आली. अनसिंग येथील शेख सलमान शेख बिस्मिल्ला हा युवक शुक्रवारी (दि.१३) रात्रीपासून बेपत्ता होता. परिसरात त्याचा शोध घेतला असता, तो आढळून आला नव्हता. शनिवारी सकाळपासूनच त्याचा शोध घेत असताना, अनसिंगपासून जवळच असलेल्या उडदी शेतशिवारातील घाटात (ता.पूसद) युवकाचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. हत्येचे कारण अस्पष्ट असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
चिमुकलीचे पितृछत हरविले
मृतक शे. सलमान शे. बिस्मिल्ला याला पत्नी, चार महिन्याची मुलगी, आई व भाऊ असा परिवार आहे. चार महिन्याची मुलगी असल्याने तिला अजून घरातील सदस्यांची साधी चेहरा ओळखही नाही. काही कळण्याच्या वयात येण्यापूर्वीच वडील शे. सलमान शे. बिस्मिल्ला याची हत्या झाल्याने चिमुकलीचे पितृछत हरविले.
खेड्यापाड्यात भूसारचा व्यवसाय
मृतक शे. सलमान शे. बिस्मिल्ला या अनसिंग परिसरातील खेड्यापाड्यात जावून भुसार (तांदूळ, गहू, सोयाबीन) माल विकत घेत होता. या व्यवसायाच्या माध्यमातून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.