पुणे : चार वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाच्या खुनाचा गुन्हा उघड करण्यात गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलच्या पोलिसांना यश आले आहे. प्रतिस्पर्धी टोळीला माहिती देत असल्याच्या संशयातून अपहरण करून तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह पुरुन टाकण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मनोज भाऊसाहेब पाडळे (वय ३०, रा़ वडगाव बु.) अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याच्या इतर साथीदारांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनायक विलास चव्हाण (वय १८, रा़ नांदेड फाटा) असे खुन झालेल्याचे नाव आहे. मनोज पाडळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने साथीदारांसोबत मिळून चव्हाण याचा खून केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी विनायक विलास चव्हाण हे बेपत्ता झाले होते. वडगाव बुद्रुक येथील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मनोज पाडळे याने त्याचा खून करून त्याचा मृतदेह नऱ्हे भागातील डोंगर उतारावर पुरला असल्याची माहिती प्रॉपर्टी सेलचे पोलिस हवालदार राजेंद्र झुंझुरके व सहायक पोलिस फौजदार अनिल शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक निकम, उपनिरीक्षक दिगंबर जाखडे, अजय म्हेत्रे, सहायक पोलिस फौजदार दत्ता गरुड, अनिल शिंदे, अनिल उसुलकर, कर्मचारी राजेंद्र झुंझुरके, राजेंद्र भोरडे, महेश साळवी, दादा खंडाळे, दिनकर भुजबळ तसेच इतर कर्मचाºयांनी साक्षीदारांना शोधून त्याची सत्यता आढळून आल्यानंतर पोलिसांनी पाडळे याला अटक केली.
विनायक चव्हाण हा नऱ्हे येथील झील कॉलेज परिसरात मिळेल ते काम करत होता. दरम्यान तेथेच मनोज पाडळे याची पानाची टपरी होती. या टपरीवरच विनायक व मनोज पाडळे आणि त्याचे साथीदार सागर पवार, विशाल खरात, विकी चावडा, बाळा उर्फ बालाजी सूर्यवंशी, पप्पू गोळे, अंकुश यांच्याशी ओळख झाली. मात्र मनोज हा परिसरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत आहे. विनायक चव्हाण हा मनोज पाडळेच्या प्रतिस्पर्धी टोळीला त्यांच्याबद्दलची माहिती देत असल्याचा संशय त्याला आला होता. त्यामुळे त्याने व त्याच्या साथीदारांनी विनायकचे १५ सप्टेबर २०१४ रोजी अपहरण केले. त्यांनी त्याला परिसरातीलच एका स्नूकर सेंटरवर नेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर १७ सप्टेबर २०१४ रोजी त्याला अभिनव कॉलेजच्या मागे असलेल्या डोंगराळ परिसरात नेऊन त्याचे हातपाय बांधून पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याचा गळा चिरून खून केला. त्यानंतर त्याला तेथेच खड्डा खणून पुरण्यात आले. त्यासोबतच त्यातील एका साथीदाराला कोणाला हा प्रकार सांगितल्यास ठार करण्याची धमकी देत तीन दिवस अडकवून ठेवले होते, असे तपासात समोर आले.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दिगंबर जाखडे यांनी सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला.