जळगाव जामोद : तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथे बैलजोडीच्या भाड्यावरून वाद होऊन त्याचे पर्यवसन एका व्यक्तीच्या खूनात झाल्याची घटना मंगळवार दिनांक ३ ऑगस्टच्या रात्री घडली. धानोरा येथील सुभाष राजाराम खाळपे यांनी बुधवार ४ ऑगस्ट जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनूसार, वामन राघोजी घुले व ज्ञानेश्वर देऊळकर, विठ्ठल देऊळकर, पांडुरंग देऊळकर यांच्यात मंगळवारी रात्री बैलजोडीच्या भाडयावरून वाद झाला. त्यावेळी वामन घुले यांच्या मुलाने त्यांना घरी नेले. वामन घुले थोड्या वेळाने पुन्हा चौकात आले असताना तिन्ही आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. विठ्ठल देऊळकर व पांडुरंग देऊळकर यांनी त्याना पकडले व ज्ञानेश्वर देउलकर यांनी त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जामोद पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास गव्हाड करीत आहेत.
बैलजोडीच्या भाड्यावरून वाद; एकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 10:54 IST