हैदराबाद : दुसऱ्या जातीच्या तरुणाशी असलेले प्रेम प्रकरण मान्य नसताना गर्भपातही करून घेण्यास नकार दिलेल्या मुलीला तिच्याच पालकांनी श्वास गुदमरवून मारून टाकले, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. ७ जून रोजी पहाटे त्या तरुणीच्या पालकांनी ती झोपेत असताना उशीने तिचे तोंड दाबून मारले. ही हत्या जोगुलांबा-गोदवाल जिल्ह्यातील कालुकुंतलात घडली. ग्राम सचिवाने या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करून विशिष्ट माहिती दिल्यानंतर तपास सुरू झाला आणि शवविच्छेदनाच्या अहवालानंतर हत्येच्या आरोपावरून जोडप्याला अटक झाली. मृत तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थी होती.
या जोडप्याला तीन मुली. मृत मुलगी सगळ्यात धाकटी. ती गरोदर असल्याचे समजल्यानंतर व तिने गर्भपातही करून घेण्यास नकार दिल्यानंतर तिला ठार मारण्याचे तिच्या आई-वडिलांनी ठरवले. पोलीस त्यांच्या घरी गेले. तिच्या अंगावर झटापट केल्याच्या खाणाखुणा दिसल्यावर त्यांनी शवविच्छेदनाचा आग्रह धरला; परंतु पालकांनी त्याची गरज नाही, असे सांगून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. शवविच्छेदनात तिचा मृत्यू श्वास गुदमरवून झाल्याचे स्पष्ट झाले. तिच्या पालकांनी चौकशीत आम्ही तिला ठार मारल्याचे कबूल केले आहे.च्शेजारच्या आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात पदवीचे शिक्षण घेत असताना ही तरुणी प्रेमात पडली. डॉक्टरकडे तपासणी केल्यानंतर गरोदर राहिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिने तिच्या पालकांना हे सांगितले.च्आपली मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून जाईल, अशी भीती तिच्या पालकांना होती. त्यातून त्यांंनी गर्भपात करून घेण्यास तिच्यावर दबाब वाढवला. सुरुवातीला ती तयार झाली; परंतु नंतर तिने नकार दिला. म्हणून त्यांनी तिला ठार मारले व तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्रत्येकाला सांगितले, असे पोलिसांनी सांगितले.