बिहारची राजधानी पाटणामध्ये मंगळवारी रात्री बाजारात इंडिगो कंपनीचे स्टेट हेड रुपेश सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रुपेश ऑफिसमधून घरी परतत होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात रुपेश हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मोटारसायकलवरुन आलेल्या मारेकऱ्यांनी रुपेश यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या, अशी माहिती समोर येत आहे. रुपेश सिंह हत्याकांडाच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जाणार असल्याचं पाटणा पोलिसांनी सांगितलं. मात्र, रुपेश राहत होते, त्या घराच्या बाहेरील सीसीटीव्ही गेल्या 2 वर्षांपासून खराब आहे. सीसीटीव्हीचं योग्य फुटेज न मिळाल्यास त्यांच्या हत्याकांडाच्या तपासात अडचणी येऊ शकतात, अशी माहिती आज तकने दिली आहे.
पेश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. ते काही दिवसांपूर्वी कुटुंबासोबत गोव्यात सुट्टीवर गेले होते. दोन दिवसांपूर्वीच ते पाटणामध्ये परतले होते. बिहारमधील छपराचे रहिवासी असलेले रुपेश पाटाणामधील सामाजिक कामांमध्ये आघाडीवर होते. सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत त्यांचे फोटो आहेत. रुपेश यांना राजकारणाची आवड होती. अनेक राजकीय पक्षांनी त्यांना मागील विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर केली होती. मात्र, त्यांनी ती ऑफर नाकारली होती.