पिंपरी : जुने भांडण व हातावर टटू काढण्याच्या कारणावरून जिगरी मित्रांनी सराईत गुन्हेगार मित्राचा खून केला. दिघी रोड, भोसरी येथे शनिवारी (दि. ८) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर आरोपी लातूरला पळून जात होते. भोसरीपोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढला. सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्यावर पाठलाग करून पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. मयूर हरिदास मडके (वय २६, रा. आळंदी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगारचे नाव आहे. रोशन हरी सौडतकर (रा. दिघी रोड, भोसरी), मंगेश शुक्राचार्य मोरे (रा. देवंग्रा, ता. औसा, जि. लातूर), प्रणेश चंद्रकात घोरपडे (रा. विजयनगर, दिघी), शुभम बलराम वाणी (रा. चौधरी पार्क, दिघी), वैभव तान्हाजी ढोरे (रा. भवानी पेठ, काशेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मयूर मडके हा आरोपींचा जिगरी मित्र होता. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास मयूर आणि त्याचे मित्र दिघी रोडवर दारू प्यायला बसले. त्यानंतर आणखी काही मित्र तेथे आले. जुने भांडण तसेच हातावर टॅटू काढण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपींनी कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी होऊन मयूरचा मृत्यू झाला.याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भोसरी पोलिसांनी तपासचक्रे फिरवून आरोपींचा तांत्रिक विश्लेषण करून शोध घेतला. खून केल्यानंतर आरोपी लातूर येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्यावर भोसरी पोलिसांच्या पथकाने आरोपी यांना जेरबंद केले. भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, सुमीत देवकर, समीर रासकर, आशिष गोपी, संतोष महाडिक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
टॅटू काढण्यावरून झाला वाद आणि मग सराईत गुन्हेगाराचा 'जिगरी' मित्रांनीच केला खून; भोसरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 4:30 PM
लातूरला पळून जाणाऱ्या आरोपींना सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्यावर पाठलाग करून पोलिसांनी केले जेरबंद
ठळक मुद्देभोसरी पोलिसांनी तपासचक्रे फिरवून आरोपींचा तांत्रिक विश्लेषण करून घेतला शोध