मुंबई - पैशाच्या वादातून नागपाडा परिसरात राहणाऱ्या एका तरूणाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली होती. या हत्येचा अवघ्या १२ तासांमध्ये उलगडा करत नागपाडा पोलिसांनी जितेंद्र कुमार (२८) या तरूणाला अटक केली आहे. या प्रकरणी नागपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. अवघ्या १०० रुपयांच्या व्यवहारामुळे ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.कॅटरिंगचा व्यवसाय असलेला जितेंद्र हा रविवारी रात्री दारूच्या नशेत नागपाड्यातील कामाठीपुरा येथे आला होता. एका वेश्यासोबत त्याची ४०० रुपयांत बोलणी ठरली. त्यानुसार जितेंद्रने ५०० रुपयांची नोट महिलेला दिली. मात्र, बाहेर पडताना वेश्या महिलेने उरलेले १०० रुपये न देता, जितेंद्रला जाण्यास सांगितले. यावेळी त्याने उरलेले १०० रुपये परत मागितले. मात्र या वेश्या महिलेने १०० रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली.
याच वादातून राग अनावर झालेल्या जितेंद्रने नशेत सोबत आणलेल्या चाकूने वेश्या महिलेवर हल्ला केला. त्यावेळी महिलेला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या शहाबाज मर्चंट याच्यावर देखील जितेंद्रने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात वेश्या आणि शहाबाज मर्चंट हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले. दोघांना उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने वेश्या महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच रुग्णालयात दाखल शहाबाज मर्चंट याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी जितेंद्रवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी दिली.