कल्याण: अजय झल्ले रावत या 24 वर्षीय तरूणावर दोघा हल्लेखोरांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना ४ सप्टेंबरला पहाटे चार वाजता पश्चिमेकडील अहिल्याबाई चौकात घडली होती. अजयचा रविवारी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणातील दोघा हल्लेखोरांना अटक करण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. रात्रीच्या वेळेस दारू पिण्यास न दिल्याने अजयची दोघांनी दांडक्याने हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.
सुनिल चौधरी (वय 27) आणि लुटो महलहार (वय 26) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही टिळकचौक, रामवाडी परिसरात राहणारे असून ते मुळचे झारखंड राज्यातील निवासी आहेत. अजयकडे दोघांनी दारूची मागणी केली होती. परंतू अजयने नकार दिल्याने दोघांनी लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता आणि नंतर त्याचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दरम्यान या गुन्हयात कोणताही पुरावा नसताना आरोपींना गजाआड करण्यात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक (गुन्हे) राजेंद्र अहिरे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांना यश आले. गुप्तबातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार टिळक चौकातील एका बांधकाम साईटवर सापळा लावून बुधवारी दोघा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक यशवंत चव्हाण यांनी दिली.