लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसीत एसआरपीएफच्या एका निवृत्त कर्मचारी महिलेचीही हत्या करण्यात आल्याचे उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसआरपीएफ कॅम्पच्या मागे सप्तकनगर आहे. येथे विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) राहत होत्या. विजयाबाई एसआरपीएफच्या मेसमध्ये कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर त्या स्वतःच्या घरात सप्तकनगरात राहायला गेल्या. त्यांचा मुलगा अमोल एसआरपीएफमध्ये सेवारत असून तो वेगळा राहतो. त्यांना दोन विवाहित मुलीसुद्धा आहेत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी १२.३० ते १च्या सुमारास मोलकरीण त्यांच्याकडे कामाला गेली असता विजयाबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. तिने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. नंतर एमआयडीसी पोलिसांना कळविले. माहिती कळताच ठाणेदार युवराज हांडे तसेच एमआयडीसी पोलिसांचा ताफा, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके आणि पोलीस आयुक्त अमितेशकुमार घटनास्थळी पोहोचले. एकट्या राहणाऱ्या वृद्ध विजयाबाई यांची हत्या कोणी आणि का केली असावी, ते वृत्त लिहिस्तोवर उघड झाले नव्हते. मात्र, लुटमारीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी, असा अंदाज पोलीस अधिकारी वर्तवित आहेत. आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी ठसेतज्ज्ञ तसेच श्वानपथक बोलवून घेतले. श्वान आजूबाजूच्या भागात घुटमळले. त्यातून पोलिसांच्या हाती ठोस असे काही मिळाले नाही.