पिंपरी : तीन अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला. मोरवाडी, पिंपरी येथे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. जखमी सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तीन हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू गोपाळ जानराव (वय ३६, रा. लालटोपीनगर, पिंपरी), असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. रफीक अमीन मनेर (वय ४५, रा. वाघेरे पार्क, पिंपरीगाव) यांनी याबाबत मंगळवारी (दि. २) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू जानराव हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या दुसऱ्या सुरक्षा रक्षकाचे काही तरुणांशी भांडण झाले होते. त्या सुरक्षा रक्षकाला मारण्यासाठी ते तीन तरुण आले. त्यांच्या हातात लाकडी दांडके होते. मात्र तो सुरक्षा रक्षक दिसून आला नाही. त्यामुळे हल्लेखोर तरुणांनी जानराव यांच्याकडे चौकशी केली. तिघांनी जानराव यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर जानराव यास स्मशानभूमीजवळ लाकडी दांडक्याने मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी जानराव लालटोपी नगर येथील आपल्या घराकडे पळाला. मात्र हल्लेखोरांनी लालटोपीनगरच्या बाहेर जानराव याला गाठले. तेथे लाकडी फळीने डोक्यात मारहाण केली. यात जानराव गंभीर जखमी झाले. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान जानराव यांचा मृत्यू झाला.
हल्लेखोरांचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना जेरबंद करून, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र यात जानराव यांचा बळी गेला. त्यामुळे लालटोपी नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.