लातूर : पुतणीचा छळ करणाऱ्या जावयाचा खून करून, चुलत सासऱ्याने गळफास घेतल्याची खळबळजनक घटना लातूर शहरातील एका लाॅजवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, उमेश रमेश देशमुख (३७, रा. कातपूर, ता. लातूर) हा पत्नीला दारू पिऊन सतत छळत हाेता. याबाबत त्याची अनेकदा समजूत घालण्यात आली. मात्र, छळ कमी झाला नाही. त्यामुळे चुलत सासरे शिवाजी दगडू शिंदे (४५, रा. अंबुलगा, ता. चाकूर) यांनी जावई उमेश यास साेमवारी सायंकाळी एका पेट्राेल पंपानजीक मारहाण केली. त्यानंतर त्यास नवीन रेणापूर नाका परिसरातील साईधन लाॅजवर नेण्यात आले. येथे जावई आणि सासऱ्यामध्ये पुन्हा बाचाबाची झाली. यावेळी शिवाजी शिंदे व लाॅजवरील सहाकारी भाऊसाहेब दगडू झाडके (३३, रा. खंडाळा, ता. लातूर) यांनी लाेखंडी राॅडने जबर मारहाण केली. मारहाणीनंतर शिवाजी शिंदे हे घरी निघून गेले. पुन्हा पहाटे ते परत लाॅजवर आले. तेव्हा जावई उमेश देशमुख हा मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पाेलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
याबाबत मयताचा भाऊ धनराज देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुरनं. ७७४ / २०२१ कलम ३०२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक महेश गळगटे करीत आहेत.
...अन् गुन्ह्याचा झाला पश्चाताप
पहाटे लाॅजवर आपल्यानंतर मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्याचे समजले. आता काय करावे? काय सांगावे? या विचारात असलेल्या शिवाजी शिंदे यांना काहीच सुचत नव्हते. दरम्यान, लाॅजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आठवण झाली. मारहाणीचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले असणार, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी एका व्यक्तीला फाेन करून बाेलावून घेतले. सीसीटीव्ही फुटेज डिलिट करण्याबाबत सांगितले. मात्र, त्या व्यक्तीने सीसीटीव्हीची छेडछाड करण्यास नकार दिला. त्यानंतर सासरे शिवाजी दगडू शिंदे यांना पश्चात्ताप झाल्याने लाॅजच्या तिसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तपासाधिकारी पाेलीस उपनिरीक्षक महेश गळगटे म्हणाले.